गिधाडांची संख्या वाढविण्याचे लक्ष्य file photo
नाशिक

Vulture Breeding Centre | देशात पाच प्रजनन केंद्र, गिधाडांची संख्या वाढविण्याचे लक्ष्य

राज्यात नाशिकमध्ये केंद्र : आठ कोटी खर्चून अडीच एकरात भव्य प्रकल्प

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : सतीश डोंगरे

१९९० च्या दशकात भारतात पाच कोटींपेक्षा अधिक संख्येनी असलेला 'निसर्गाचा सफाई कामगार' गिधाड आता काही हजार संख्येत आहे. निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाडाच्या तिन्ही प्रजाती २००६ पर्यंत ९९ टक्के नामशेष झाल्या. याचा केवळ निसर्ग साखळीवरच नव्हे तर मानव जातीवरही विपरीत परिणाम झाल्याने, भारतीय वन्यजीव कायद्यात संरक्षण सूची-१ मध्ये समाविष्ट असलेल्या गिधाडाचे संवर्धन करण्यासाठी देशातील पाच राज्यांमध्ये प्रजनन केंद्र उभारले जात आहे. राज्यात नाशिकमध्ये तब्बल आठ कोटी खर्चुन, अडीच एकरात हे केंद्र उभारले जात असून, सहा महिन्यात ते कार्यान्वित होणार आहे.

नाशिक -अंजनेरी येथे उभारले जात असलेले गिधाड प्रजनन व संवर्धन केंद्र

प्राण्यांवरील उपचारासाठी वापरले जाणारे 'डायक्लोफिनॅक' हे वेदनाशामक औषध गिधाडांसाठी कर्दनकाळ ठरले. या औषधामुळे अवघ्या १५ वर्षात देशभरातील गिधाड झपाट्याने मृत पावले. २००६ पासून या औषधांवर बंदी घातली असली तरी, गिधाडांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याने केंद्र सरकारने देशातील पाच राज्यांमध्ये गिधाड प्रजनन केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याकरिता केंद्राने गिधाड संवर्धन कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार ४० कोटी खर्चुन महाराष्ट्र (नाशिक), गोरखपूर (उत्तर प्रदेश), कोइम्बतूर (तामिळनाडू), रामनगर (कर्नाटक) आणि त्रिपुरा या पाच राज्यात गिधाड प्रजनन केंद्र उभारले जात आहे. नाशिकमध्ये अंजनेरी शिवारातील त्र्यंबकरोडलगत असलेल्या पश्चिम वनविभागाच्या जागेत प्रजनन केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राची पायाभरणी झाली असून, पुढील सहा महिन्यात ते कार्यान्वित होईल, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे.

पिंजोरच्या धर्तीवर केंद्र

हरियाणामधील पिंजोरच्या धर्तीवर नाशिकमध्ये गिधाड प्रजनन व संवर्धन केंद्र उभारले जात आहे. आठ कोटी खर्चुन अडीच एकर परिसरात हे केंद्र उभारले जात आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगा गिधाड वन्यजीवाच्या दोन प्रजातीचे मुख्य अधिवास क्षेत्र म्हणून ओळखले जाते. लांब चोचींचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे या भागात वास्तव्य आढळून येते. अंजनेरी डोंगरावर गिधाडे घरटी करून राहतात. येथून जवळच असलेल्या ब्रह्मगिरी, मेटघर किल्ला या भागातसुद्धा गिधाडांचा अधिवास आढळतो.

गडचिरोली, नाशिकमध्ये वास्तव्य

जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती असून, त्यातील नऊ प्रजाती भारतात आहेत. बीअर्डेड, सीनरस, इजिप्शीअन, युरेशियन, हिमालयीन, लांग बिल्ड, रेड हेडेड, स्लेंडर बिल्ड, ओरिएंटेल व्हाईट बॅक या गिधाडाच्या प्रजाती देशात आढतात. पैकी लॉंग बिल्ड, स्लेंडर बिल्ड व ओरिएंटेल व्हाईट बॅक या तीनच प्रजातींची गिधाडे दिसून येतात. उर्वरित ६ प्रजाती जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकमध्ये व्हाईट बॅक म्हणजेच पांढऱ्या पाठीचे आणि लांब चोचीचे गिधाड आढतात. तर तर गडचिरोलीमध्ये दुर्मिळ काळ्या गिधाडाचे वास्तव्य आहे.

खोरीपाड्यात 'गिधाड रेस्टॉरंट'

हरसूल वनपरिक्षेत्रात खोरीपाडा जंगलाजवळ गिधाडांकरिता रेस्टॉरंट सुरू केले आहे. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी पेठ वनपरिक्षेत्रात सावर्णा येथे हा प्रयोग करण्यात आला. दिंडोरी वनपरिक्षेत्रात रामशेजजवळ याठिकाणीही वर्षभरापूर्वी गिधाडांसाठी रेस्टॉरंट सुरू केले. येथे मृत झालेले पाळीव प्राण्यांचे मृतदेह वनकर्मचाऱ्यांकडून आणून टाकले जातात. त्यामुळे याभागात १५० पेक्षा अधिक गिधाड असल्याचे वन विभागाने निरीक्षण नोंदविले आहे.

९८ टक्के गिधाड नामशेष

देशात गिधाडांच्या ज्या तीन प्रजाती आहेत, त्यांचे २००० च्या दशकात मोठे नुकसान झाले आहे. १९९२ ते २०९७ च्या सुमारास पांढरे गिधाड सुमारे ९९.९ टक्के नामशेष झाले आहेत. पाठोपाठ भारतीय गिधाड ९५ टक्के आणि लाल डोक्याचे गिधाड ९१ टक्के कमी झाल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. इजिप्शियन गिधाड आणि ग्रिफन गिधाड यांची संख्या प्रचंड रोडावल्याने, धोका वाढला आहे.

गिधाड संवर्धनासाठी प्रजनन आणि संवर्धन केंद्र माइलस्टोन ठरणार आहे. याठिकाणी प्रजननाबरोबरच जखमी गिधाडांवर उपचारही केले जाणार आहेत. याशिवाय येथे लॅब असल्याने, इतर संशोधन अपेक्षित आहे. पुढील सहा महिन्यापर्यंत सर्व केंद्र कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.
- पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT