Voting will be held on EVM machines in Madhya Pradesh
नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने मतदान यंत्र व केंद्राची निश्चिती केली आहे. जिल्ह्यातील नगरपंचायती, नगर परिषदा, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा शाखेने मध्य प्रदेशातील १२ हजार ईव्हीएम मशीन मागवले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही या संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून मतदारयाद्यांचे पुनरीक्षण केले जात आहे.
दुसरीकडे जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यातील मतदान केंद्र व त्यासाठी लागणारे ईव्हीएम मशीनची संख्याही निश्चित केली आहे. दोन महिन्यांत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी ११ हजार ८२३ ईव्हीएम मशीनची गरज लागणार आहे. हे मशीन मध्य प्रदेशातून मागवण्यात आले आहे. यात इंदूर येथून १० हजार ४० मशीन येणार आहेत.
सिहोर येथून १७८३ येणार आहेत. हैदराबाद येथून ३९४१ कंट्रोल युनिट येणार असल्याने सध्या नाशिक जिल्ह्याच्या निवडणुका या मध्य प्रदेशच्या मशिनींवर पार पडणार आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे टेक्निशियन प्रशिक्षणासाठी येणार आहे. हे प्रशिक्षण पाच जिल्ह्यांसाठी विभागीय महसूल कार्यालयात होणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
निवडणूक आयुक्त गुरुवारी घेणार आढावा
राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त हे गुरुवारी निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. यात प्रामुख्याने मतदारयाद्या, ईव्हीएम मशीन याबाबतचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच अतिवृष्टी व महापूर यांनी झालेल्या नुकसानीवरदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.