

Despite four ministers, three lakh farmers are waiting for help
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फोल ठरली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात हेविवेट चार कॅबिनेट मंत्री अन् पाचवे कुंभमेळा मंत्र्यांचा वॉच असतानाही जिल्ह्यात तीन लाख पाच हजार ६०८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून ३१७ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. या मंजूर रकमेपैकी आतापर्यंत केवळ ७८ कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यभरात अतिवृष्टीने थैमान घातले होते. यात जिल्ह्यातील चार लाख १८ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असताना सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. या अंतर्गत जिल्ह्यासाठी ३१७ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांची मदत जाहीर झाली. या मदतीचे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
परंतु, हे आश्वासन फोल ठरले आहे. मदत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची माहिती देत वृत्त प्रसिद्ध करून घेतले. प्रत्यक्षात अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. प्रशासनाकडून २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रकम जमा करण्यास प्रारंभ केला. परंतु, केवळ एक लाख १३ हजार २९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ४२ लाख ३३ हजार रुपये मदत जमा होऊ शकलेली आहे. अद्यापही तीन लाख पाच हजार ६०८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
वितरणात हे आहेत अडथळे
जिल्हा प्रशासनाकडून फॉर्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात आली. परंतु, अनेकांकडे फॉर्मर आयडी नसणे, आधारकार्ड व सातबारावरील नावात विसंगती, बैंक खाते लिंक नसणे, तसेच इतर तांत्रिक मुद्द्यांमुळे भरपाई वर्ग करणे रखडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.