Voter ID  Pudhari
नाशिक

Voter ID Cards | सिडकोत मतदार ओळखपत्रांमध्ये चुका

महिलांच्या ओळखपत्रावर पुरुषांचे फोटो, एकाच व्यक्तीच्या नावाने फोटोसह तीन वेगवेगळे ओळखपत्र

पुढारी वृत्तसेवा

सिडको (नाशिक) : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको परिसरातील रायगड चौक आणि पवननगर भागात मतदार ओळखपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळल्या आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचा धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर दावा सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी करत भारतीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यघटनेने प्रत्येक १८ वर्षांवरील नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे आणि तो बजावण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ओळखपत्र दिले जाते. सिडको भागात महिलांच्या ओळखपत्रावर पुरुषांचे छायाचित्र, एकाच व्यक्तीच्या नावाने आणि छायाचित्रासह तीन वेगवेगळी ओळखपत्रे आणि काही ठिकाणी छायाचित्र व कार्ड क्रमांक सारखे असूनही नावे वेगवेगळी असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर चुकांमुळे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या चुकीच्या ओळखपत्रांचा गैरवापर होऊन बोगस मतदान होण्याचा धोका तयार झाला आहे, अशी भीती गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाला तडा जाण्याची भीती गांगुर्डे यांनी व्यक्त केली.

गांगुर्डे यांनी केलेल्या दाव्यांमुळे गतवर्षी सुधाकर बडगुजर यांनी मतदारयादीतील घोळांबाबत केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. परंतु आता बडगुजर भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सिडकोतील हा मुद्दा मागे पडला होता. योगेश गांगुर्डे यांच्या नव्या दाव्यामुळे हा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केल्यामुळे राजकारण ढ‌वळून निघाले आहे. आयोगाने याचे खंडन केले असले, तरी नवनवीन मुद्दे विरोधी पक्षांकडून सातत्याने पुढे येत आहेत.

जिल्हा कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष

सिडकोतील मतदारयाद्यांच्या अचूकतेबाबत शिवसेना उबाठा गटाने सातत्याने प्रश्न उपस्थित केलेले आहेत. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत मतदारयाद्यांतील घोळांबाबत अनेकदा आयोगावर टीका केलेली आहे. गांगु़र्डे यांच्या दाव्याबाबत जिल्हा निवडणूक कार्यालय काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT