

नाशिकरोड : राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतर उडणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक विभागाची आढावा बैठक नाशिकरोड येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आयुक्त वाघमारे यांनी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपंचायती अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. प्रामुख्याने मतदार यादी निश्चित करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, निवडणूक साहित्य, मनुष्यबळ आणि बॅलेट युनिटची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. यंदा 30 टक्के मतदान केंद्रांची वाढ आली, तर एका केंद्रावर 900 मतदार मतदान करू शकतील, अशी व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एक जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित केले जातील. मात्र, कोणते मतदार निश्चित करायचे आणि कोणाची नावे काढून टाकायची हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. प्रभाग रचना 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण लॉटरी आणि रोटेशन पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. मतदारांसाठी योग्य सुविधा व सुविधा यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. माध्यमांच्या मदतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे यावेळी आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केली जात असली, तरी ईव्हीएम सुरक्षित असल्याचा स्पष्ट निर्वाळा आयुक्त वाघमारे यांनी दिला. ते म्हणाले, यापूर्वी अनेक वेळा या संदर्भातील याचिकांवर निर्णय दिले गेले आहेत. आपल्याकडे ईव्हीएम कमी पडणार असल्याने याबाबत मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यंदा व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार नाही. या निवडणुकांमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर केल्यास प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरते. सध्या देशातील कोणत्याही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर होत नाही, असे वाघमारे यांनी नमूद केले. तसेच निवडणूक आयोगाकडून अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील, अशी शक्यता वाघमारे यांनी व्यक्त केली.