Vishwa Marathi Samelan 2026 Pudhari
नाशिक

Vishwa Marathi Samelan 2026: बोली भाषेमुळे महाराष्ट्र समृद्ध : मधू मंगेश कर्णिक

कालिदास नाट्यगृहात दादासाहेब फाळके रंचमंचावर मराठी बोलींचा महोत्सव साजरा करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. बोलीभाषेने मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी नाशिक केले. चौथ्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत हाेते.

मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२६) कालिदास नाट्यगृहात दादासाहेब फाळके रंचमंचावर मराठी बोलींचा महोत्सव साजरा करण्यात आला. चौथे विश्व मराठी संमेलनात गुरुवारी (दि.२६) मराठी बोलींचा महोत्सवाचे उदघाटनप्रसंगी मधू मंगेश कर्णिक बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. मिलिंद जोशी, विश्वास ठाकूर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.

मधू मंगेश कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्र हे साहित्य, कला, संगिताला महत्व देणारे राज्य आहे. हजारो वर्षांपासून बोली भाषा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आहेत. बोली भाषेला महत्व दिले तरच मराठी भाषा समृद्ध होईल. शासनाने सुरू केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले की, मराठी भाषा ही ज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी. बोली भाषांना संजीवनी मिळाली, तरच मराठी ही ज्ञान भाषा होईल. बोली भाषा समृद्ध झाल्या तरच मराठी भाषा समृद्ध होईल. त्यासाठी बोली भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी. आठवीच्या वर्गापासून भाषा विज्ञान शिकवावे, असे त्यांनी नमूद केले. साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचे नाशिक हे साहित्यतीर्थ आहे. बोली भाषांचे महत्व नाकारून चालणार नाही. बोली भाषा या मराठी भाषेसाठी जीवनवाहिन्या असल्याचे डॉ. मिलिंद जोशी म्हणाले.

मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, कवी प्रकाश होळकर, सुरेखा बोऱ्हाडे, रमेश पडवळ, डॉ. प्रतिभा जाधव, विद्या सुर्वे, सुनील ढगे, रवींद्र कदम, डॉ. विजय काकतकर, चारुदत्त दीक्षित यांचा सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी केले. आभार डॉ. प्रदीप ढवळ यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT