नाशिक : सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारच्या (दि.26) रोजी मिसळ पार्टीनंतर शिंदे यांनी ठाकरे गटात आपल्याला सातत्याने डावलले गेल्याची उघड नाराजी व्यक्त केली असून, येत्या रविवारी (दि. 29) आठ माजी नगरसेवकांसह ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी डी. जी. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन उपनेते बडगुजर यांनी पक्षातील खदखद व्यक्त करताना 10-12 नेते व माजी नगरसेवक नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या वक्तव्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्यानंतर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरे गटाला धक्का दिला. या घडामोडीत शिंदे यांनी खा. संजय राऊत यांची भेट घेत आपण नाराज नसल्याची भूमिका माध्यमांसमोर मांडली होती. परंतु, बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर उपनेतेपदी निवड झालेल्या दत्ता गायकवाड यांच्यासमवेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाण्याचे शिंदे यांनी टाळले होते. यातून त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेस भेट घेतली होती.
नवीन जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमले, त्यांच्या मागे कार्यकर्ते नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती झाली. डी. जी. सूर्यवंशी हे माझ्यापेक्षा 15 वर्षे ज्युनिअर आहेत. आता त्यांच्या हाताखाली काम करायचे का? मी पक्षाच्या पदोन्नतीच्या कॅटेगिरीत बसत नाही काय?, अशा प्रश्नांची सरबत्ती शिंदे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीतही मला उमेदवारी नाकारली. माझी नाराजी मी खा. संजय राऊत यांच्याकडे व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही त्यावर काहीच हालचाल नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
ठाकरे गटात मला सातत्याने डावलेले गेले. क्षमता असूनही पक्षनेत्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समर्थक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. समर्थकांच्या भूमिकेचा आदर करणे माझे कर्तव्य आहे.विलास शिंदे, माजी महानगरप्रमुख, ठाकरे गट
गुरुवारी (दि. 27) वाढदिवसाच्या नियोजन बैठकीच्या निमित्ताने विलास शिंदे यांनी समर्थकांसह मिसळ पार्टी आयोजित केली. त्यानंतर शुक्रवारी (दि. 28) माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटाविषयी उघड नाराजी व्यक्त केली. तेथूनच ते आठ माजी नगरसेवकांसह शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. हा प्रवेश सोहळा रविवारी (दि. 29) होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.