

नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे ३० वर्षांपासून संबंध आहेत. मुलीच्या लग्नात इतरांप्रमाणे शिंदे यांनाही आमंत्रित केल्याने ते उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा ते नाशिकला आल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी भेटलो. याचा अर्थ मी पक्ष सोडतो, असा नाही. अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे मंगळवारी (दि. १०) खुलासा सादर केला.
आगामी मनपा निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटात उलथापालथ होत असल्याने, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत, उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर, पक्षातील इतरही नाराजांच्या चर्चांना वेग आला होता. त्यातच बडगुजर यांनी, विलास शिंदे यांच्यासह पक्षातील डझनभर नेते नाराज असल्याचा दावा केल्याने अन् शिंदे यांनी सलग दोनदा उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे बाेलले जात होते. दरम्यान, या चर्चा रंगत असतानाच, विलास शिंदे यांनी मंगळवारी (दि. १०) संपर्कनेते संजय राऊत यांची भेट घेऊन, एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतचा खुलासा व राजीनामाही सादर केला. दरम्याान, शिंदे यांच्या भेटीनंतर राऊत यांनी, 'विलास शिंदे हा कट्टर शिवसैनिक आहे. शिवसेनेचा तो पक्का माणूस आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही.' अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत, चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाशानंतरही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल काय? हे पुढील काळात स्पष्ट होईलच. दरम्यान, शिंदे यांच्यासमवेत माजी नगरसेवक संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
संपर्कनेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर विलास शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राऊत यांना माझ्या भावना सांगितल्या. येत्या आठ दिवसांत ते नाशिक येथे बैठक घेऊन यावर चर्चा करणार आहेत. तसेच माझी नाराजी हा पक्षांतर्गत विषय असल्याचे मी त्यांना स्पष्टीकरण दिले आहे. मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून ज्या गोष्टी घडल्यात त्या मी राऊत यांच्या कानावर टाकल्याचे शिंदे यांनी सांगितले.
विलास शिंदे हा कट्टर शिवसैनिक आहे. शिंदेंसोबत माझी चर्चा झाली आहे. शिवसेनेचा तो पक्का माणूस आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही.
संजय राऊत, खासदार, उबाठा