Radhakrishna Vikhe Patil Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case Update | "अज्ञानातून भेट झाली"; भोंदू अशोक खरात प्रकरणावर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण

Ashok Kharat Case Update | जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते. त्यावेळी शिंदे यांनी अशोक खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानकडे जावे यासाठी दीपक केसरकर आग्रही होते. तेव्हा मी त्यांच्यासोबत खरात याच्याकडे गेलो होतो. काही गोष्टी अज्ञानातून घडल्या, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातबाबत काहीच माहिती नव्हती. ते मला म्हणाले की, एके ठिकाणी जायचे आहे.

अशोक खरातबाबत माहिती असती तर ते तिकडे गेले असते का? असा सवालही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. एका बैठकीच्या निमित्ताने भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे आलेल्या विखे-पाटील यांनी बुधवारी (दि. १५) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भोंदू अशोक खरात भेटीबाबत माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, भोंदू खरात प्रकरणात आम्ही पहिला गुन्हा शिर्डीत दाखल केला म्हणून हे प्रकरण उघडकीस आले.

अनेक महिला अशोक खरातच्या वलयाला बळी पडल्या अशोक खरातचे कारनामे माहीत असूनही त्याच्याकडे जाणे गंभीर आहे. परंतु, काही जण अज्ञानाने गेले असून, त्यात अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांनी कोणावर आरोप केले असतील, तर त्यांनी त्याचा तपशील विशेष तपास पथक (एसआयटी) कडे द्यावा आणि यात एसआयटीला चौकशीचे काम निष्पक्षपणे करू द्यावे, असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दमानिया यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबतचे सत्य चौकशीत समोर येईल. अनेकांचे पाय धुताना फोटो आहेत, भाषण करताना नावे आलेली आहेत. आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार आहे, असे समजून शिर्डीतील काही लोक बळी पडले. पण यासाठी लोकांना दोष देऊ नये, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नमूद केले.

माझं भविष्य जनताच ठरवते

खरात प्रकरणानंतर यापुढे कोणी भविष्य सांगायला आले तर आधी त्याचेच भविष्य बघावे लागेल, अशी मिश्किल टिपण्णी करताना मी कोणाकडेही भविष्य बघायला जात नाही. माझं भविष्य जनताच ठरवते, असा टोलाही विखे-पाटील यांनी विरोधकांना लगावला.

'कॉर्पोरेट जिहाद' विरोधात कठोर कायदा हवा!

टीसीएससारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांच्या लैंगिक छळाचा प्रकार घडणे गंभीर आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहादनंतर हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार समोर आला आहे. प्रचलित कायद्यांविषयी गुन्हेगारांमध्ये भीती राहिली नसल्यामुळे अशा घटना वाढीस लागल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांमधील नराधमांवर कारवाई होणेसाठी कायदे अधिक कठोर करण्याची गरज असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. लैंगिक छळाचा प्रकार निंदनीय आहे. परंतु संबंधित कंपनीकडून युनिट बंद करण्याची कारवाई योग्य नसल्याचे नमूद करत काही अपप्रवृत्तींमुळे युनिटमधील अन्य जणांचा रोजगार हिरावला जाणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT