नाशिक

Vijayadashami Market : अतिवृष्टीने दसरा बाजारपेठेतील चैतन्य हरपले

खरेदीवर परिणाम, शहरात पूर्व, पश्चिम भागांत रावण दहन

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव (नाशिक ) : शहर, तालुक्यात विजयादशमी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. शहर व ग्रामीण भागांत सप्तशृंगी, अंबामाता, तुळजा भवानी यांसह सप्तमातृकांचे विविध मंदिरांत दर्शन घेत श्रीफळ वाढवून सीमोल्लंघन करीत सण साजरा करण्यात आला. सायंकाळी मित्र, आप्तेष्ट, नातेवाइकांनी एकमेकांना आपट्याची पाने देत शुभेच्छा दिल्या.

बाल गोपाळांमधील उत्साह वगळता, यंदा विजयादशमी सणावर अतिवृष्टी, कांदा दर घसरणीचे सावट मोठ्या प्रमाणात जाणवले. त्यामुळे बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. सोने, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक वस्तू व होम अप्लायन्सची यथातथाच विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवसायात 35 टक्के घट झाल्याचे बहुसंख्य व्यावसायिकांनी सांगितले. शहरातील दसरा महोत्सव समितीतर्फे सायंकाळी पूर्व भागातून श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांची रथातून पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढत चंदनपुरी गेटवर सीमोल्लंघन करीत महालक्ष्मी चौकातील दसरा मैदानावर रावण दहन करण्यात आले.

मिरवणुकीत शहरातील तरुण व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील पश्चिम भागातील दसरा महोत्सव समितीतर्फे रावण दहन सोहळा गिरणा नदीकाठावरील श्रीरामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. समितीचे संस्थापक सुनील गायकवाड, मदन गायकवाड, अध्यक्ष दीपक बच्छाव, समिती सदस्य व सहकार्‍यांनी रावण दहन कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सटाणा रस्त्याने रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. सटाणा नाका, शिवरस्ता या मार्गाने मिरवणूक मैदानावर पोहोचली. श्रीरामाच्या वेशभूषेतील तरुणाने बाणाने वेध घेत रावण दहन केले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी व रोषणाई करण्यात आली. फायर शोप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

पूर्व भागातील रथोत्सव व रावण दहन जल्लोषात पार पडला. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधून काहींनी थोड्या फार प्रमाणात सोने खरेदी केली. व्यवसाय यथातथाच होता, असे गोविंद नामदेव दुसाने ज्वेलर्सचे राजेश दुसाने व पवार ज्वेलर्सचे राजेंद्र पवार यांनी सांगितले. मुहूर्त साधून विविध आस्थापना, बांधकामे, शोरूम व दुकानांचा उद्घाटन समारंभ पार पडला. येथील सटाणा रस्त्यावरील ओटीएम मॉलच्या उद्घाटनप्रसंगी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. याशिवाय रुग्णालय परिसर असलेल्या भागातच मॉलच्या उद्घाटनासाठी झालेले ढोल-ताशांचे वादन अनेकांसाठी डोकेदुखी ठरली होती. बाजारपेठेत उत्साहाचा अभाव तालुक्यातील अतिवृष्टी, खरीप हंगामाचा तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकर्‍यांमध्ये असलेले चिंतेचे सावट, कांदा दरातील घसरण, चाळीत कांदा सडल्याने झालेला वांदा या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत उत्साहाचा अभाव दिसून आला. शहरातील प्रसिद्ध महिंद्रा, पंचगंगा ट्रॅक्टरमधून दसर्‍याच्या मुहूर्तावर 51 ट्रॅक्टरची विक्री झाली. मागील वेळी सुमारे 175 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. व्यवसायावर काहीसा परिणाम झाल्याचे महिंद्रा पंचगंगाचे संचालक मयूर दशपुते यांनी सांगितले. त्याच वेळी एथर, बजाज दुचाकीची समाधानकारक विक्री झाल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात काहीसा उत्साह कमी असला, तरी शहरात नोकरदारांनी दुचाकी, चारचाकी खरेदी केल्या. स्टर्लिंग मोटर्सच्या येथील टाटा शोरूममधून 28 वाहनांची विक्री झाल्याचे व्यवस्थापक संदीप पगारे यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले. जीएसटी दर कमी झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. वाहन कंपन्यांच्या विविध ऑफर्स व योजनादेखील आहेत. त्यामुळे नोकरदारांनी वाहन खरेदी केली. विक्री समाधानकारक होती, असे विविध वाहन विक्रेत्यांनी सांगितले.

झेंडूची फुले मातीमोल

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. मात्र, सणासाठी महत्त्वाच्या असणार्‍या झेंडू फूल विक्रेते व शेतकर्‍यांचा हिरमोड झाला. यावर्षी अवकाळी, अतिवृष्टीमुळे आवक कमी असेल. भाव वाढतील या आशेने कळवण व देवळा तालुक्यांसह परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू शहरात विक्रीस आणला होता. विक्रमी आवक झाल्याने व त्या प्रमाणात मागणी नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. सकाळी झेंडू 50 ते 70 रुपये किलो दराने विक्री सुरू होता. दुपारी तो घसरून 30 रुपये किलोवर आला. सायंकाळी 20 रुपये किलो दरानेही ग्राहक नव्हते. झेंडू फुले मातीमोल ठरली. यंदा फुले घेऊन कळवण परिसरातील आम्ही 100-200 विक्रेते आलो होतो. व्यवसायच झाला नाही. जेमतेम खर्च व गाडीभाडे निघाले, असे कनाशी येथील मीराबाई व लक्ष्मण बागूल या फूल विक्रेत्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT