Women workplace safety | प्रश्न महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेचा 
नाशिक

Women Safety Nashik Police | महिलांच्या छळप्रकरणी कठोर कारवाई आवश्यक : विजया रहाटकर

Women Safety Nashik Police | सविस्तर अभ्यासानंतर 'टीसीएस' अहवाल लवकरच करणार मुख्यमंत्र्यांकडे सादर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील टीसीएस व भोंदू प्रकरणांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर भूमिका घेत, संबंधित अहवालाचा अभ्यास करत तो लवकरच मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. महिलांच्या छळप्रकरणी कठोर कारवाई आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तालयात भेट दिली असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शहरातील टीसीएस प्रकरण, भोंदू खरात प्रकरण तसेच इतर लैंगिक छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर यांनी बुधवारी (दि. ६) नाशिक दौऱ्यात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. टीसीएस प्रकरणाचा अहवाल मला प्राप्त झाला असून, मी सध्या नाशिकमध्येच आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत अहवालाचा सविस्तर अभ्यास करत तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रहाटकर यांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त किरिथिका सी. एम., मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, विशेष तपास पथकाचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

रूपाली चाकणकर यांच्याबाबत सुरू असलेल्या चौकशीवर बोलताना रहाटकर म्हणाल्या की, या प्रकरणात ज्यांची चौकशी आवश्यक आहे, त्यांची चौकशी नक्कीच केली जाईल. पोलिसांचा तपास सुरू असून, त्यांना स्वतंत्रपणे काम करू देणे गरजेचे आहे. योग्य वेळी पोलिस संबंधितांना चौकशीसाठी बोलावतील.

नाशिकमधील खरात प्रकरण आणि टीसीएस अत्याचार प्रकरण या दोन्ही घटनांना त्यांनी अत्यंत गंभीर संबोधले. पोलिसांचे काम सुरू असून, त्यांना आवश्यक तो वेळ दिला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी 'फॅक्ट फाइंडिंग' कमिटी नेमली होती. ही समिती दोन दिवस नाशिकमध्ये होती. तिचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच संबंधित यंत्रणांकडे पाठवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त

भोंद खरात प्रकरणी बोलताना, ज्या ठिकाणी महिलांना त्रास झाला आहे, तिथे कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांच्या छळाच्या प्रत्येक घटनेत गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये, कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी पडताळणी करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पुण्यातील अत्याचार प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त करत, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, पोलिस तपास सुरू आहे. मुख्यमंत्रीही या प्रकरणात लक्ष घालत असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT