देवळाली कॅम्प: देवळाली मतदारसंघात इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश केला. यंदा कोणत्याही परिस्थितीत देवळालीत भाकरी फिरवायचीच, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दररोज मोठे इनकमिंग होत असून, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे व विष्णू थेटे यांच्या हस्ते प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी सांगितले की, शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहेत. आगामी काळात देवळाली विधानसभेवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी प्रत्येकाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे, विष्णू थेटे, महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, कचरू तांबेरे, सुनील कोथमिरे, सुवर्णा दोंदे, डॉ. शिवानी पवार, बाळासाहेब आडके, वर्षा पवार, आनंदा मोंढे, देवरगावचे उपसरपंच सुरेश मोंढे आदी उपस्थित होते.
अनुसूचित जातीसाठी १९७८ पासून राखीव झालेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणूक विजयानंतरचे होसले बुलंद झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे.
देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी इतर पक्षांतून इनकमिंग सुरू झाले आहे. या पक्षाचे प्रदेश नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदारपुत्राने संवाद यात्रा सुरू केल्याने शरद पवार गटातील इच्छुकांचे काही अंशी धाबे दणाणले आहे. त्यातच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. आघाडीमध्ये ही जागा कोणाला जाणार, हे अद्याप निश्चित नसले तरी देवळालीत राजकीय हवा तापली आहे.
मतदारसंघ राखीव झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या १० विधानसभा निवडणुकांमध्ये तीनदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे, तर सात वेळा भाजप-शिवसेना विचाराचे उमेदवार विजयी झालेले आहेत.
२०२४ ची आगामी निवडणूक महायुती विरुद्ध महाआघाडी अशी होणार असली, तरी दोन्ही बाजूंनी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातच लोकसभेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना देवळाली मतदारसंघातून २७ हजार मतांची आघाडी मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांनीही या जागेवर हक्क दाखवला आहे. तसेच काँग्रेसला देशभरासह राज्यात मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन काँग्रेसनेही हा मतदारसंघ आम्हाला सोडण्यासाठी आघाडीकडे दावा केला आहे. लोकसभेत मतदारांनी महाआघाडीच्या उमेदवाराला कौल दिला असल्याने आघाडीकडून जागांची निश्चिती झालेली नाही.
अनेक इच्छुक उमेदवार सोशल मीडिया माध्यमातून आपली दावेदारी पेश करीत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे इतर पक्षांतून येणाऱ्यांची संख्या अधिक असून अनेक इच्छुक मुंबई वाऱ्या करत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबई येथे देवळालीत शरद पवार गटाचा आमदार निवडून आणायचाच, असा संकल्प बोलून दाखवला. त्यामुळे ही जागा नेमकी आघाडीकडून कोण लढवणार याची उत्सुकता मतदारांना आहे.
काँग्रेसने १९८०, ८५ या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार दिले होते, तर १९९५ मध्ये काँग्रेसने विश्वनाथ काळे यांना उमेदवारी दिली असता, त्यांनी तब्बल ४१ हजार ४२० मते घेतली होती. काँग्रेसकडे जनाधार असूनही पक्षाने हा मतदारसंघ गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन पाहिजे तसे उभे राहू शकलेले नाही. त्यामुळे यंदा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला असून, पारंपरिक मतदारांच्या भरवशावर उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे.