Vani Gutka Ban Violation Pudhari File Photo
नाशिक

Vani Gutka Ban Violation | वणीसह परिसरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री

Vani Gutka Ban Violation | महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी लागू होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र अनेक भागांसह वणी ग्रामीण व शहरी भागातील वास्तव पाहिले असता, ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

वणी : अनिल गांगुर्डे

महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी लागू होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र अनेक भागांसह वणी ग्रामीण व शहरी भागातील वास्तव पाहिले असता, ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील रस्ते, बसस्थानक परिसर, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि गल्लीबोळांत अनेक नागरिक उघडपणे गुटखा खाताना व थुंकताना दिसतात. हजारोंच्या संख्येने लोक गुटखा सेवन करीत असताना, प्रतिबंधित असलेला हा गुटखा नेमका येतो कुठून, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील अनेक छोट्या - मोठ्या दुकानांमध्ये छुप्या पद्धतीने गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून, ग्राहकाला हवा तो ब्रँड काही मिनिटांत मिळतो. त्यामुळे 'जर बंदी आहे, तर माल उपलब्ध कसा?' हा प्रश्न आहे. पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणा वेळोवेळी कारवाया करीत असल्या, तरी गुटख्याचा पुरवठा थांबलेला दिसत नाही. एखादा साठा पकडला जातो, तर दुसऱ्याच दिवशी त्याच परिसरात पुन्हा गुटखा उपलब्ध होतो. त्यामुळे कारवायांचा नेमका परिणाम काय, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.

गुटखा तस्करीमागे संघटित आणि मजबूत साखळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायात घाऊक पुरवठादार, वाहतूक साखळी आणि किरकोळ विक्रेते यांचे जाळे खोलवर रुजले असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्राबाहेरील राज्यांतून विविध मार्गांनी गुटखा आणला जात असल्याची चर्चा असून, दूध वाहतूक करणारी वाहने, भाजीपाला गाड्या, मालवाहू वाहने आदींचा वापरही होत असेल, काही सांगता येत नाही.

ज्याप्रमाणे वाहतूक पोलिस वणी सापुतारा रस्त्यावर वाहने तपासतात मग गुटख्यासाठी पोलिस यंत्रणा व अन्न व औषध प्रशासन संयुक्त तपासण्या करताना कधी आढळून आले नाही. सीमावर्ती मार्गांवर किंवा प्रमुख प्रवेशद्वारांवर किती वेळा संयुक्त तपासणी मोहीम राबविली जाते? वर्षातून एखादी मोठी कारवाई करून गाजावाजा केला जातो; मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुटखा माफियांना नेमके कोणाचे संरक्षण मिळते का, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

'गुटखाबंदी' केवळ कागदावरच !

गुटख्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असताना, प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. केवळ साठे जप्त करून किंवा प्रसारमाध्यमांसमोर आकडेवारी मांडून प्रश्न सुटणार नाही. गुटख्याच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेऊन त्याची मुळे उपटण्याची गरज आहे अन्यथा बंदीचे फलक झळकत राहतील आणि दुसरीकडे गुटख्याचा काळाबाजार फोफावतच राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT