

दिलीप भिसे
कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यात आंतरराज्य गुटखा तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. गुटखा तस्करीतून दररोज किमान 25 ते 30 कोटींची उलाढाल होत असतानाही पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन गांधारीच्या भूमिकेत आहे. अन्न व औषध प्रशासनाने 1 एप्रिल 2025 ते 1 एप्रिल 2026 काळात अवघ्या 20 टपर्यांवर छापा टाकून कारवाईत 25 संशयितांना जेरबंद केले. ट्रक भरुन तस्करी होत असताना केवळ पंटरवर कारवाई तर आंतरराज्य टोळ्यातील सराईतांना मोकळीक अशीच काहीशी स्थिती आहे. गुटखा बंदी आदेशाला अक्षरश: कोलदांडा मिळत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.
आरोग्याला घातक ठरणार्या अमली पदार्थासह गुटखा तस्करीचे प्रमाण चिंताजनक आहे. जिल्ह्यातील पुणे-बंगळूर तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गावर ट्रक भरून गुटख्यासह सुंगधी तंबाखूची रात्रंदिवस खुलेआम तस्करी होत असतानाही यंत्रणा अक्षरश: ढिम्म आहे. शाहूवाडी, मलकापूरसह राधानगरी, भुदरगड, गडहिग्लज, कागल, मुरगूड, हातकणंगले, शिरोळसह सीमावर्ती भागात कर्नाटक, गोव्यासह आंध—, राजस्थानातील तस्करांनी गुटख्याच्या उलाढालीचे साम—ाज्य उभारले आहे. तरीही स्थानिक प्रशासन यंत्रणा हातावर घडी ठेवूनच आहे. गुटखा तस्करीतून शहर, जिल्ह्यात दररोज कोट्यवधींच्या उलाढाली होत असताना अन्न व औषध प्रशासनाला वर्षात अवघ्या 39 लाख 29 हजार किमतीचा साठा हाताला लागला आहे. यावरून यंत्रणांची कार्यक्षमता दिसून येते.
कर्नाटकातील कुख्यात गुटखा तस्करी टोळ्यांचा हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत शिरकाव होतो आहे. अलीकडे एकाही बड्या तस्करांवर कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक निरंजनकुमार शर्मा यांनी नशामुक्त प्रभाग अभिनव संकल्पनेचा गजर केला आहे. गुटखा तस्करांच्या तावडीतून कोवळ्या पोरांना वाचवा, ही पालकांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.
व्यसनामुळेे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त
शहर, जिल्ह्यात अमली पदार्थांसह गुटखा, माव्यासह नशेली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत असल्याने 16 ते 22 वयोगटातील तरण्यापोरांचे तोबरे गुटख्या, माव्याने भरलेली असतात. परिणामी लहान वयात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांना बळी पडणार्यांची संख्याही काही कमी नाही. व्यसनाने अनेक गोरगरीब कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.