नाशिकरोड : संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मंदिरात पादुका आणताना वारकरी तुतारी वाजवताना, तर पांडुरंगाच्या पोशाखात हजारो वारकऱ्यांची लोटलेली गर्दी. 
नाशिक

Vaishnav Mela Nashik Road - नाशिकरोडला भरला वैष्णवांचा मेळा

अभंग, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाने दुमदुमला परिसर

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारच्या विसाव्यासाठी नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात दाखल झाला. संपूर्ण परिसर वैष्णवांचा मेळा भरल्याची अनुभूती आली. 'निवृत्तिनाथ महाराज की जय', 'ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल... विठ्ठल...' या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुगाचा निनाद, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि मंगल कलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला, मुखी हरिनाम आणि हृदयात विठ्ठल भेटीची आस अशा अलौकिक वातावरणात पालखीचे नाशिकरोडमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन व मंगल कलश घेऊन भक्तिभावाने पालखीसोबत मार्गक्रमण करत होत्या. उंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भक्त जाती विठ्ठलाचे... "या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाची अक्षरश अनुभूती येत होती. दत्त मंदिर, बिटको चौक परिसरात पालखीचे आगमन होताच भाविकांनी फुलांची उधळण करून आणि हरिनामाच्या गजरात रथाचे स्वागत केले. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारातून पालखी प्रांगणात प्रवेश करताच श्री गुरुनिवृत्तिनाथ महाराज की जय" या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, संतांच्या अभंगांच्या सुरावटीत आणि वारकरी संप्रदायाच्या अद्वितीय परंपरेच्या साक्षीने नाशिकरोड परिसर पंढरीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुक्तिधाम मंदिरात विश्वस्त चौहान कुटुंबाच्या वतीने पालखी रथातील संतांच्या पादुका डोक्यावर घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुख्य गाभाऱ्यात नेल्या. त्यानंतर पादुकांची पाद्यपूजा करण्यात आली. मंदिर परिसरात टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलाच्या अभंगांचे गायन तसेच महिला वारकऱ्यांनी फुगड्या खेळल्या.

यावेळी लहान मुलांसह वारकऱ्यांनी पांडुरंगासह अनेक संतांचे पोशाख धारण केल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात होते. यंदाच्या वारीत 'आपली वारी, आपला सोहळा' या संकल्पनेसह निर्मल वारी, हरित वारी हा संदेश प्रभावीपणे दिला जात आहे. संपूर्ण वारी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी वारकरी जनजागृती करत असल्याची माहिती संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दुपारच्या विसाव्यानंतर वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभघेतला. त्यानंतर दुपारी ३ च्या दरम्यान पालखीने पुढील मुक्कामासाठी पळसे गावाच्या दिशेने सिन्नर फाट्याकडे प्रस्थान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT