Nashik Firing Case pudhari photo
नाशिक

Nashik Firing Case | गांधीधाम गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शिर्डीतून जेरबंद

Nashik Firing Case | देवळाली गावातील गांधीधाम परिसरात भररस्त्यात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या मुख्य आरोपीला उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शिर्डी परिसरातून अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवळाली गावातील गांधीधाम परिसरात भररस्त्यात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या मुख्य आरोपीला उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शिर्डी परिसरातून अटक केली. आरोपी किशोर सुरेश निकम याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

३ जून रोजी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास एनएमसी क्वार्टर, गांधीधाम, देवळाली गाव येथे किशोर निकम, राहुल निकम आणि एका अनोळखी साथीदाराने मोटारसायकलवर येऊन जुन्या वादातून रितीक राजेंद्र पारचे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर किशोर निकम याने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी परिसरात जमलेल्या नागरिकांना धमकावत, 'आज हा वाचला, पण या भागात कोणी मस्ती केली तर त्याला जिवंत सोडणार नाही. आम्ही येथील डॉन आहोत,' असे म्हणत दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर रितीक पारचे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी अहिल्यानगरमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सलग दोन दिवस शोधमोहीम राबविली.

५ जून रोजी मध्यरात्री मुख्य आरोपी किशोर निकम हा शिर्डी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, जयंत शिंदे, गौरव गवळी, सूरज गवळी, पंकज कर्पे आणि संदेश रघतवान यांच्या पथकाने सावळीविहीर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

अंगझडतीदरम्यान आरोपीकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याला उपनगर पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण सांगळे करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलिस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलिस अंमलदार जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रघतवान, पंकज कर्पे, प्रशांत देवरे, सतीश मडवई, प्रवीण सांगळे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील गोसावी यांनी यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT