साक्री तालुक्यात 'अवकाळी' मुळे फळबागायतींचे ८० लाखांचे नुकसान; शासनाकडून मदतीची मागणी File Photo
नाशिक

Pimpalner Unseasonal Rains : साक्री तालुक्यात 'अवकाळी' मुळे फळबागायतींचे ८० लाखांचे नुकसान; शासनाकडून मदतीची मागणी

नाशिकच्या पिंपळनेर परिसराला गेल्‍या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rains in Sakri taluka cause loss of Rs. 80 lakhs to orchards

पिंपळनेर : अंबादास बेनुस्कर

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकळीने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असून, तालुक्यातील सर्वच भागात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसामुळे पिकांसह बागायती क्षेत्रास मोठा फटका बसला आहे. फळबागेसोबतच अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले आहे.

पिंपळनेर परिसराला पडलेल्या गारांचा देखील मोठा फटका बसला आहे. यातून तालुक्यात 70 ते 80 लाखांहून अधिकचे नुकसान या अवकाळीने झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. सुदैवाने जीवितहानीची कुठेही नोंद झालेली नाही.साक्री तालुक्यात यावेळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे कांदा काढणी एकच वेळी आल्याने मजूर अभावी कांदा काढणीस उशीर झाला. त्यात काही शेतकऱ्यांचा काढलेला कांदा शेतातच पडला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्रीचा कागद मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. त्यामुळे काढलेला कांदा हा पाण्यात सापडल्यामुळे तो मोठ्चा प्रमाणात वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. तरी या नुकसानीची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतक-यांकडून शासनाकडे करण्यात येत आहे.

फळबागांचे अवकाळीत झाले मोठे नुकसान

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी फळबाग लागवडीकडे वळल्याचे दिसून येते आहे. यातून तालुक्यातील फळबाग क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा फळबागा क्षेत्रास बसला आहे. यात तालुक्यातील ज्या सहा गावांना सर्वाधिक फटका बसला त्यात कांदा, मकासोबतच पपई, आंबा, डाळिंब, केळीचे क्षेत्र बाधित झाले आहे.

घोडदे शेतशिवारातील स्नेहलता ठाकरे यांच्या शेतातील 400 आंब्याच्या झाडांची बाग असून वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने झाडावरील कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सारे येथील सचिन देसले यांच्या शेतातील 4 एकरांत लावलेल्या टोमॅटोचे, चार एकरांतील पपईचे, मिरची, कांदा पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा झाला खंडित

या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे विद्युत पुरवठाही काही काळ खंडित झालेला होता. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने, तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झालेला होता. रस्त्यावर वादळामुळे झाडे पडलेली होती. काटवान परिसरात माळमाथा परिसर तसेच पश्चिम पट्टढा पिकांचे नुकसान झाले असून, काही भागात तर गारपीटही झाली होती. यामुळे वीज पुरवठा खंडीत होऊन सर्वत्र आंधार झाला होता. दुसऱ्या दिवशीही तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

अवकाळीचा कांद्याला बसला मोठा फटका

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ठोस नगदी पीक म्हणून गेल्या काही वर्षात शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. अशातच दरवेळी नैसर्गिक आपत्तीचा फटका कांदयास बसत असतो. आताच्या अवकाळी पावसाचा देखील कांदा पिकास मोठा फटका बसला आहे. यात अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणी झाल्यानंतर कांदा शेतात पडून होता. तो पावसात भिजल्याने नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.

शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

काही कांदा काढण्यात आला असून शेतातच पडला आहे. तर काही क्षेत्रात अजून कांदा काढणी चालू आहे. त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण कांद्याचे पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाच्यावतीने तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. शेतकऱ्यांना या अवकळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, तालुक्यातील सहा गावातील 54.50 हेक्टर क्षेत्रात 33 टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. यात फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT