नाशिक : आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा सुरूच असून, सोमवारी (दि.12) नाशिकसह ग्रामीण भागाला पुन्हा अवकाळीने झोडपून काढले.
नाशिक शहरात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यांसह धुवाधार पावसाने सुमारे १५० हून अधिक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या. सातपूर येथील टपारिया कंपनीजवळ अंगावर झाड पडून दोन कामगार युवकांचा मृत्यू झाला, तर अनेक ठिकाणी फांद्या विद्युत तारांवर तसेच रस्त्यांवर पडल्याने कर्मचाऱ्यांना त्या हटविताना चांगलीच कसरत करावी लागली. तब्बल ७० कर्मचाऱ्यांचे पथक झाडे हटविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करत होते
पाच दिवसांपासून शहर परिसरात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. जोरदार वारे व मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडत आहेत. सोमवारीदेखील जवळपास १५० हून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीजतारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. सद्यस्थितीमध्ये रस्त्यांवरील झाडे बाजूला करून वाहतूक मोकळी करण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये झाडांच्या फांद्या हटवल्या जाणार आहे.
देवळाली गाव येथील राजवाडा भागातील मित्र असलेले दोन युवक कामावर जात असताना झाड अंगावर पडून मृत्यू झाला. गौरव भास्कर रिपोर्टे (21) आणि सम्यक भोसले (19) अशी या युवकांची नावे आहेत. आहेत. हे दोघे दुचाकी एमएच 15, एचडब्ल्यू 0565 या दुचाकीवरून सातपूर येथील कंपनीत कामावर जात असतानाच कामगार हॉस्पिटलच्या मागे टपारिया कंपनीजवळ अचानक त्यांच्या दुचाकीवर झाड कोसळले. यावेळी स्थानिकांनी तत्काळ धाव बचाव कार्य केले. तसेच खासगी वाहनाद्वारे त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र, यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघे युवक सोबतच कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.