चांदवड (नाशिक) : चांदवड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवार (दि.२५) रोजी अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला. काही मिनिटांच्या मुसळधार पावसाने शेतांपासून रस्त्यांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभ्या अस्मानी संकटात सापडले आहे.
शनिवारी (दि.25) रोजी दुपारी सुमारास सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर सुरु होता. शेतातील पाण्याचे लोंढे पाहून शेतकरी हवालदिल झाले. वडनेरभैरव, धोडांबे, दह्याने, बहादुरी, कानमंडाळे, वडाळीभोई, सोग्रस, राहूड आणि कळमदरे परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीतून कसाबसा सावरत असलेला बळीराजा पुन्हा अवकाळीने पूर्णपणे कोलमडला आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका कांदा व द्राक्ष पिकांना बसणार आहे. दोन–अडीच महिन्यांचा कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर अर्ली द्राक्ष बागांवरील घडांवर करपा, डावन्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. परिणामी द्राक्ष उत्पादनात घट येऊन निर्यातयोग्य दर्जाही घसरण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीत उन्हाळ कांद्याचे बियाणे खराब झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने बियाणे टाकले होते; परंतु सध्याच्या अवकाळीमुळे तेही धोक्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु वारंवार होणाऱ्या पावसामुळे प्रशासनासमोरही आव्हान उभे राहिले आहे.