

चांदवड ( नाशिक ) : तालुक्यात शुक्रवारी (दि.24) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. खरीप हंगामातील काढलेले मका आणि सोयाबीन पीक, जनावरांचा चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांची एकच धावपळ उडाली.
तालुक्यातील दुगाव, डोंगरगाव, उसवाड, सुतारखेडे, हरनूल, हरसूल, चांदवड, गणूर, मंगरूळ, शेलू, पुरी, मतेवाडी, वडबारे, नांदूरटेक, राहूड, राजदेरवाडी, कानमंडाळे, सोग्रस आणि वडाळीभोई, तळेगावरोही, रायपुर, वडगावपंगू, काजीसांगवी आदीसह सर्वच गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उरले-सुरले कांदा पीक भिजल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच उन्हाळ कांद्याच्या रोपांवर परिणाम होऊन लागवडीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी आगामी उन्हाळ कांदा उत्पादनावर याचा थेट परिणाम होणार आहे.
दरम्यान, द्राक्ष पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यामुळे शेतकर्यांना अधिक आर्थिक झळ लगणार आहे.
आधीच कमी बाजारभाव आणि वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे चिंतेत असलेल्या शेतकर्यांवर या अवकाळी पावसाच्या रूपाने अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून, दिवाळीच्या दिवशी पावसाने शेतातच दु:ख साचले, असे म्हणत शेतकरी हतबल झाले आहेत.
येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
अरबी समुद्रात सात दिवस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात दि. 25 ते 29 ऑक्टोबरपर्यंत जोरदार अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज जोपूळचे हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी दिला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना बसणार आहे.
मनमाडला अवकाळीचा फटका
शुक्रवारी सायंकाळी मनमाडसह ग्रामीण भागात अवकाळीने जोरदार
हजेरी लावली. सुमारे तासभर वादळी वार्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचा फटका कांदा रोपे, काढून ठेवलेल्या मक्याला बसणार आहे. तसेच पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने ऑक्टोबर हीटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.