नाशिक : मे महिन्यात अवकाळीमुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार गावे बाधित झाली असून सुमारे 19 हजार 907 शेतकर्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने पंधरा तालुक्यातील 6 हजार 570 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपीके नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
मे महिन्यात पारा चाळीशीपार पोहोचल्याने उकाडा असह्य होत होता. मात्र 7 मे पासून अवकाळीने दणका द्यायला सुरुवात केली. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांना झोडपून काढतांना अवकाळीने बहुतांश शेतीपिके आणि फळपिकांना नष्ट केले. काढणीला आलेला कांदा अन साठवणूक केलेला कांदाही यातून वाचू शकला नाही. जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 570 हेक्टर क्षेत्राला अवकाळीने बाधित केले. वादळीवारे, अतिवृष्टी, अवेळी पावसाने शेतीपिकांचे आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकार्यांनी पंधरा तालुक्यातील नष्ट झालेल्या शेतीपिकांचा प्राथमिक अहवाल तयार करुन कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षकांना सादर केला आहे. कृषी अधिक्षकांनी तो जिल्हा प्रशासनाला सादर केला. नष्ट झालेल्या पिकांमध्ये 14 हेक्टरवर लावलेला मका पूर्णत: नष्ट झाला तर 88 हेक्टरवरील कांद्याच्या रोपवाटिका आणि 2 हजार 800 हेक्टरवरील कांदा पिकावर संक्रांत कोसळली. 64 हेक्टरवरील गहुपिके,130 हेक्टरवरील टॉमेटो तर साडेसातशे हेक्टरवरील भाजीपाला नष्ट झाला. अवकाळीने 3 हजार 887 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.
अवकाळीत दोन हजार 320 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्याचे हवामान हे आंबापिकाला अनुकूल असल्याने मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक घेतले जाते. मात्र, यंदा अवकाळीने आंबापिकालाही नष्ट केले. सुमारे 2 हजार हेक्टरवरील आंबापिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळीमुळे 2 हजार 320 हेक्टरवरील फळपिके नष्ट झाली आहेत.
जिल्ह्यात बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. जिल्ह्याचे वातावरण फळपीकांना पोषक असल्याने फळपीकांची शेतीही येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र मे महिन्यात अवकाळीने शेतकर्याला आसमान दाखविले. जिल्ह्यातील 1 हजार गावांतील सुमारे 20 हजार शेतकर्यांची बागायती पिके नष्ट झाली एप्रिलमध्ये बागायतीचे 1870 हेक्टर तर मे महिन्यात 3 हजार 887 हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
बळीराजाकडून भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. मुख्य बागायती पिकासोबत भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र अवकाळीने बागायती पिकांसोबत 750 हेक्टरवरील भाजीपाला नष्ट केल्याने शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे भाजीपाला महागण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात सततच्या पावसाने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. मात्र, या परिस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंतच्या नुकसानाची पंचनामे अंतिम टप्यात आहेत. 31 मे रोजी पंचनाम्यांचा अहवाल शासनाला देणार आहे.अभिमन्यू काशीद, प्रभारी, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी
कोरडवाहू क्षेत्रासाठी 13 हजार 600, बागायत क्षेत्रासाठी 27 हजार, फळपीके क्षेत्रासाठी 36 हजार प्रती हेक्टर दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानूसार एकूण 6 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
जिल्हा कांदा लागवडीसाठी ओळखला जातो. दरवर्षी सुमारे 5 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा पीका लावले जाते. मात्र अवकाळीने यंदा 2 हजार 887 हेक्टरवरील कांदा पिके नष्ट झाली. यामुळे पुन्हा कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.