नाशिक
अवकाळी पावसाच्या दणक्याने निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर व परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेPudhari News Network

Unseasonal Rain Nashik | अवकाळीचा कहर; कांदा उत्पादक हतबल

Nashik News | अवकाळी पावसाच्या दणक्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Published on

लासलगाव (नाशिक) : गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने निफाड तालुक्याला चांगलेच झोडपले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर व परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदे, मका, पालेभाज्या या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतक-यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

ब्राह्मणगाव विंचूर शिवारात मजुरांअभावी उन्हाळ कांदा काढणी बाकी आहे. त्यात आता अवकाळीने पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. दररोज दुपारनंतर आणि पहाटेच्या वेळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पावसाने कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, शेतात काढलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर, देवगाव, भरवस, दहेगाव, पाचोरे, मरळगोई, गोंदेगाव, गोळेगाव, विंचूर, लासलगाव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने जोर धरल्याने भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम वेगाने सुरू होते. चार-पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतातील सडलेल्या कांदा पिकाचे त्वरित पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकरी बाळासाहेब शिवराम गवळी, दत्तात्रय छबू जाधव, ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव, संदीप चव्हाण व मका पिकाचे बाधित शेतकरी राहुल शेजवळ यांच्यासह अनेक शेतकरी करीत आहेत.

नाशिक
पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतक-यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.Pudhari News Network

आधीच्या पावसाने उन्हाळ कांदा बियाणाचे नुकसान झाले आहे. कांदा लागण उशिरा झाल्यामुळे आणि आता मजुरांअभावी कांदे काढणीस उशीर झाल्यामुळे त्यात निसर्गाचा कोप यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुल शेजवळ, लासलगाव, नाशिक.

अनेक शेतकरी कांदा काढणीमध्ये व्यग्र असताना जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे त्यांच्या शेतातील कांदा पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला आहे. कांदा, शेतात काढलेला मका या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन बिघडले आहे.

सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव विंचूर, नाशिक

कांद्याची लागवड केल्यानंतर संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन या माध्यमातून केले जाते मात्र आता विक्रीसाठी तयार असलेला कांदा पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्यामुळे संपूर्ण नुकसान झाले आहे. नुकसान हे कधीही भरून निघणार नाही. पूर्ण वर्षभर आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

रामभाऊ भोसले, शेतकरी, गोंदेगाव, नाशिक

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कांदा उत्पादकांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

शिवा सुरासे, माजी सभापती, पंचायत समिती निफाड, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news