Rain Damaged Crop due to Sinnar Unseasonal  pudhari photo
नाशिक

Sinnar Unseasonal Rain Crop Damage |सिन्नरला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

Sinnar Unseasonal Rain Crop Damage | २०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीने उभी पिके आडवी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील सुमारे २०९.७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून ३७९ शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. काढणीला आलेली पिके हातातून गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

सिन्नर : तालुक्यात रविवारी (दि. २९) व सोमवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार सुमारे २०९.७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ३७९ शेतकरी प्रभावित झाले आहेत.

रविवारी दुपारी वडगाव पिंगळा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे गहू, कांदा, टरबूज, शिमला मिरची तसेच आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्यांची फळगळ झाली, तर कापणीस तयार असलेली पिके जमीनदोस्त झाली.

सोमवारी दुपारी पुन्हा विजांच्या कडकडाटासह सिन्नर, ठाणगाव, देवपूर भागात पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारांचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धावपळ उडाली. कृषी विभागाने नुकसानीची दखल घेत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनीही प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून, तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे. दि. ४ एप्रिलपर्यंत अवकाळीचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गावनिहाय पिकांचे नुकसान

गावनिहाय नुकसानीत वडगाव पिंगळा येथे कांदा ९० हेक्टर, गहू २५ हेक्टर तसेच स्वीट कॉर्नचे १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मानोरी येथे भाजीपाला ५५ हेक्टर व गव्हाचे काही क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. विंचूर दळवी येथे गहू ६.७० हेक्टर, कांदा १० हेक्टर, स्वीट कॉर्न ४ हेक्टर आणि भाजीपाला ४ हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला आहे.

नांदूरशिंगोटे, ठाणगावी शेतकऱ्यांची धावपळ

नांदूरशिंगोटे परिसरात सोमवारी (दि. ३०) दुपारी ३ च्या सुमारास तसेच ठाणगाव शिवारात अचानक मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली. सध्या परिसरात कांदा, गह काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. पावसामुळे उघड्यावर ठेवलेला कांदा व उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मालेगाव शहरासह तालुक्यात अवकाळीचा कहर

मालेगाव : शहरासह तालुक्यात सोमवारी (दि. ३०) सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीट झाली. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, शेती पिकांनाही फटका बसला.

सायंकाळी ५ च्या सुमारास आकाश दाटून आले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. कॅम्प परिसरात गारपीट झाल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सोमवारी भरणाऱ्या कॅम्प येथील बाजारात गर्दी असताना पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांचे हाल झाले. अनेकांनी आसरा शोधण्यासाठी धावाधाव केली, तर काही विक्रेत्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र गारपिटीमुळे शहरातील काही भागांत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील अजंग, वडेल, वडनेर खाकुर्डी, रावळगाव, दाभाडी आदी गावांना अवकाळी पावसासह गारपिटीने जोरदार तडाखा दिला. कांदा व गहू पिकांचे नुकसान झाले. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, या पावसाने नुकसानात आणखी भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT