Vegetable Market (Pudhari Photo)
नाशिक

Nashik Vegetable Market | पळसे सर्व्हिस रोडवरील अनधिकृत भाजी मार्केटच्या वाहतुकीला ब्रेक

Nashik Vegetable Market | नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वैतागले

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे महामार्गालगत पळसे गावाजवळ सर्व्हिस रोडवर मागील चार वर्षांपासून भरत असलेला अनधिकृत भाजी बाजार आता वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरू लागला आहे. या मार्केटमुळे सकाळच्या वेळी शहराकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासी बसेसना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पळसे शिंदे परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, रिक्षा, छोटी वाहने व दुचाकीवरून भाजीपाला विक्रीसाठी येथे आणत असतो. शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्री करतो हे खरे असले, तरी अत्यंत अरुंद असलेल्या सर्व्हिस रोडवरच बाजार भरत असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी एका वाहनाला १० ते १५ मिनिटे लागत असून, इंधनाचा अपव्यय होत आहे. शिवाय काही स्थानिकांच्या सहकार्याने शहरातून येणारा व्यापारीवर्ग येथे प्रवासी व वाहनधारकांशी अरेरावी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा व्यापारीवर्ग कुणाच्या आशीर्वादाने अरेरावी करतो, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पर्यायी जागेची मागणी

हा भाजी बाजार तातडीने सर्व्हिस रोडवरून हलवावा व योग्य ठिकाणी भरवावा अशी मागणी प्रवासी, नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे. तात्पुरत्या स्वरूपात हा बाजार भरवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी सूचना नागरिक करीत आहेत. शेतकरी, व्यापारीवर्ग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

मोठा अनर्थ घडण्याची भीती

नाशिक-पुणे महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) वरून रात्रंदिवस सुसाट वेगाने अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थांची वाहने, प्रवासी वाहने जात असतात. यापूर्वी याच महामार्गावर भरदुपारी बसला आग लागून तिघांचा मृत्यू आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली होती. तसेच या ठिकाणी छोटे-मोठे अपघातही वारंवार होतात. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी हा भाजी बाजार मोठ्या अपघाताला आमंत्रण ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT