

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून वितरीत होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबरोबरच त्याची सुरक्षित साठवणूक आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन होते की नाही, याची तपासणी आता अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) केली जाणार आहे. या तपासणीत दुकानदारांकडे असलेला एफएसएसएआय परवाना, त्याची वैधता, धान्याची साठवणूक, दुकानातील स्वच्छता तसेच अन्नपदार्थ दूषित होणार नाहीत, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सुमारे ९९ टक्के रेशन दुकानदारांकडे एफएसएसएआय परवाने होते. मात्र, त्यानंतर काही बचत गटांना रेशन दुकानांचे परवाने मिळाले असून, काही नवीन दुकानदारांचीही भर पडली आहे. या नव्याने सुरू झालेल्या दुकानांना एफएसएसएआय नोंदणी अथवा परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच जुन्या दुकानदारांच्या एफएसएसएआय परवान्याची मुदत संपली असल्यास त्याचे तातडीने नूतनीकरण करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
दरम्यान, एफडीएच्या तपासणीदरम्यान दुकानातील धान्य साठवणूक योग्य पद्धतीने केली आहे का, धान्य जमिनीवर थेट ठेवले आहे का, ओलावा किंवा कीड लागलेली आहे का, तसेच दुकानाची स्वच्छता आणि परिसराची स्थिती कशी आहे, याची पाहणी होऊ शकते. तसेच गरज भासल्यास संबंधित अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाऊ शकतात.
एफएसएसएआय परवाना अथवा नोंदणी न घेतलेल्या दुकानदारांवर तसेच अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व रेशन दुकानदारांनी आपला एफएसएसएआय परवाना वैध आहे की नाही, याची खात्री करून घेण्याबरोबरच धान्याची सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने साठवणूक करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.
"जिल्ह्यातील कार्यरत तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या रास्तभाव (रेशन) दुकानांची एफएसएसएआय नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत धान्य वितरण अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी एफएसएसएआय नोंदणी करून नोंदणी क्रमांक प्राप्त करावा, नोंदणी न केल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दुकानाचा परवाना/शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण करण्यास अडचणी येऊ शकतात."
— रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक