नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विक्रमी तापमानवाढीमुळे नाशिककरांचा जीव कासावीस बनला असताना धरणातील अपुरे पाणी आरक्षण आणि चर खोदण्याच्या परवानगीला होणारा विलंब लक्षात घेता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अघोषित पाणीकपातीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असताना शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, आता तर प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाण्याचा पुरवठाही होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. त्यातच व्हॉल्व्हमनला हाताशी धरून पाणीपुरवठा आपल्या भागात वळविण्यासाठी माजी नगरसेवकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा पाणीकपातीची तीव्रता अधिकच वाढविणारी ठरली आहे.
गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. याचा थेट फटका महापालिकेला बसला असून, नाशिककरांच्या पाणीआरक्षणात कपात करण्यात आली आहे. नाशिककरांना पिण्यासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना जेमतेम ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणीआरक्षण उपलब्ध होऊ शकले. त्यातच शहरात प्रतिदिन केला जाणारा १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा लक्षात शिल्लक पाणीआरक्षण १२ जुलैपर्यंतच पुरू शकणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डिसेंबरपासून शहरात पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाला राजकारण्यांकडून विरोध झाला. दरम्यान, नाशिककरांची तहान भागविण्यासाठी कमी पडणाऱ्या ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याच्या उपलब्धतेसाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुढे आला. मात्र लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया रखडली. या कामासाठी शासनाची विशेष परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेने शासनाच्या मुख्य सचिवांच्या समितीकडे प्रस्ताव पाठविला. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळू शकलेली नाही. अशा परिस्थितीत संभाव्य पाणीसंकट लक्षात घेता प्रशासनाने अघोषित पाणीकपात सुरू केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने, कमी वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे या वृत्तास दुजोरा मिळू लागला आहे.
अनियमिततेसाठी व्हॉल्व्हमन जबाबदार
शहरातील अनियमित पाणुपरवठ्यासाठी व्हॉल्व्हमन जबाबदार असल्याची माहिती पुढे येत आहे. काही 'बाहुबली' माजी नगरसेवकांनी व्हॉल्व्हमनला हाताशी धरून आपल्याच भागात अधिक पाणीपुरवठा होण्यासाठी दबाव निर्माण केल्याने दुसऱ्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी जलकुंभ ते प्रत्यक्ष ग्राहक वितरणात होणाऱ्या त्रुटींचा शोध घेतला असता त्यातूनही हा प्रकार समोर आला. पाणीपुरवठ्याच्या लॉकबुकच्या नियमाची अंमलबजावणीही होत नसल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या २३७ व्हॉल्व्हमनपैकी १०७ कंत्राटी आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवकांच्या शिफारशीवरच कामाला लागले असल्याने पाणीवितरणात हस्तक्षेप होत असल्याचे समजते.
महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केलेली नाही. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तर असमान पाणी वितरणाच्याही तक्रारी आहेत. काही ठिकाणी व्हॉल्व्हमनकडून चुकीच्या पध्दतीने कामे केली जात असल्याने संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. – संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, मनपा
हेही वाचा –