नाशिक / भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला विद्यार्थ्यांचा 'उलंगुलान मोर्चा' ठाणे हद्दीतील खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांनी अडवला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत धक्काबुक्की झाल्याने सहा ते सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
प्रकृती अस्वस्थ झालेल्या तीन मुलींसह तीन विद्यार्थ्यांना रांजनोली नाका येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोपांवर भिवंडी पोलिसांनी मात्र विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याचा दावा केला आहे.
आश्रमशाळांमधील विविध प्रश्नांवरून सुरू झालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी भिवंडीत दाखल झाला होता. भिवंडी बायपास येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आंदोलक विद्यार्थी रात्री विश्रांतीसाठी थांबले होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला काही पोलिसांनी मुंबईकडे जाण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर खासगी वाहनाने मुंबईच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांना ठाणे हद्दीतील खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांनी रोखले. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, खारेगाव येथे त्यांना दोन ते तीन तास ताटकळत ठेवण्यात आले.
यावेळी वाहनांमध्ये पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने काही विद्यार्थी अस्वस्थ झाले. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अरुण पावरा याने पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीत आपण बेशुद्ध पडल्याचा आरोप केला. पोलिसांनी रुग्णालयात किंवा पोलीस ठाण्यात न नेता रस्त्यावरच सोडल्याचेही त्याने म्हटले आहे.
या घटनेनंतर वैष्णवी खिल्लारे, वैशाली आणि संजना या तीन विद्यार्थिनींसह अरुण पावरा आणि अन्य विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. सहकाऱ्यांनी त्यांना रांजनोली नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांनंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मुंबईतील आंदोलनाला परवानगी न मिळाल्याने अखेर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांसोबतच मोर्चाकऱ्यांना हाताळण्याच्या पोलिसांच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आश्रमशाळांतील प्रश्नांवरून सुरू आहे आंदोलन:
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांसह गेल्या दोन वर्षांत सहाशहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या मृत्यूंसाठी आदिवासी विकास मंत्रालयाला जबाबदार धरत आंदोलकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गडचिरोली येथे सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, आश्रमशाळांमध्ये जेवण बनविण्याची परवानगी देऊन सेंट्रल किचन बंद करावे, तसेच आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव व संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या.
पोलिसांचे म्हणणे काय?:
भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून सहकार्य केले. विद्यार्थ्यांकडे स्वतःचे जेवण असल्याने त्यांनी पोलिसांच्या जेवणाला नकार दिला; त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली. मुंबईतील मोर्चाला परवानगी नसल्याने मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना रांजनोली नाक्यावर आणून सोडले. त्यांना आणताना नेमका काय प्रकार घडला, याची माहिती नसल्याचे बनसोड यांनी सांगितले. मात्र, भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना सहकार्यच केल्याचा दावा त्यांनी केला.
"आमच्या सोबत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आम्हाला तीन ते चार तास इकडे-तिकडे फिरवले. त्यामुळे सहा ते सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. पोलिसांनी मदत करण्याऐवजी त्रास दिला."- वैष्णवी खिल्लारे, विद्यार्थिनी
"एका पोलिसाने हाताच्या कोपराने छातीत मारल्याने मी बेशुद्ध झालो. कपडे आणि कागदपत्रे मुंबईतच राहिली आहेत. ती घेण्यासाठीही आम्हाला मुंबईला जाऊ दिले जात नाही."- अरुण पावरा, विद्यार्थी