Nashik Dongrale Rape and Murder Case Pudhari
नाशिक

Nashik Dongrale Rape-killed Case| 'दादा' म्हणणाऱ्या चिमुरडीचा विश्वासघात; आरोपीला फाशी

Ujjwal Nikam shares details on Dongrale verdict- अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले तपास पथकाच्या मेहनतीचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : डोंगराळे येथील चारवर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विजय खैरनारला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निकालानंतर विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पीडित बालिकेच्या निरागसतेची आठवण सांगितली. 'दादा' म्हणून विश्वास ठेवणाऱ्या बालिकेने आरोपीवर दाखविलेल्या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे होते. सरकारी पक्षाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातून समोर आलेल्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. पोलिस अधिकारी, तपास पथक, वैद्यकीय अधिकारी आणि अन्य संबंधितांनी केलेल्या परिश्रमांमुळे खटल्याची बाजू प्रभावीपणे मांडता आल्याचे निकम यांनी सांगितले.

हा गुन्हा 'दुर्मीळातील दुर्मीळ' असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. अपहरण आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांचा कारावास आणि दंड, तसेच पीडित कुटुंबीयांना राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेंतर्गत १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्त्ती व्हावी, यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खटला तातडीने हाती घेण्याबाबत सूचना दिल्याचे निकम यांनी सांगितले.

बालिकेच्या आठवणीने मन हेलावले

पीडित बालिका अभ्यासात हुशार होती. गावातील लहान मुलांना ती इंग्रजीतील अक्षरे आणि शब्द शिकवत असे. तिच्या या गुणांची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली होती. बालिकेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची जाणीव होऊन मन सुन्न झाल्याचे निकम यांनी सांगितले. या निकालामुळे पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला असून, तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT