नाशिक: माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांच्या विरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले फास्टट्रॅक न्यायालयात चालवावेत, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. या संदर्भातील अर्ज धोत्रे बंधूंकडून उद्धव निमसेविरुद्ध आणि सरकारी वकिलांकडून जगदीश पाटीलविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
अर्जाला न्यायालयाची परवानगी मिळाल्यास दोघांनाही दीर्घकाळ कारागृहात घालवावा लागणार आहे. फास्टट्रॅक प्रक्रियेने खटल्यातील सुनावणी वेगाने होणार असल्याने महिनाभरावर आलेल्या मनपा निवडणुकांत त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १७ सप्टेंबरला पंचवटीतील राहुलवाडी येथे पूर्व वैमनस्यातून सागर जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात जगदीश पाटील यांच्यावर कटकारस्थानाचे आरोप ठेवत त्यांना २१ सप्टेंबरला अटक करण्यात आली.
दरम्यान, २३ ऑगस्टला नांदूरनाका येथे राहुल धोत्रे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. उपचारादरम्यान २९ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मुख्य संशयित आरोपी म्हणून १५ सप्टेंबरला माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून दोन्ही माजी नगरसेवक जेलमध्ये आहेत. या दोघांचे ही अर्ज जिल्हा सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. दोन्ही घटनांत गंभीर आरोप, वाढता सार्वजनिक दबाव लक्षात घेता खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी जगदीश पाटील व उद्धव निमसे यांचे विरोधक करत आहे.
माजी नगरसेवक उद्धव निमसेच्या जामीन अर्जावर 16 ला सुनावणी
माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या जामीन अर्जावर १६ डिसेंबरला सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोपपत्र दाखल होण्याच्या अगोदर उद्धव निमसेचा सत्र न्यायालय व उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला.