

नाशिकरोड : नांदूरनाका येथील राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा संशयितांना ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित माजी नगरसेवक उद्धव बाबूराव निमसे अद्यापही फरार आहेत.
नांदूरनाका येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यावेळी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी जमावाला चिथावणी दिल्याने जमावाने राहुल धोत्रे आणि त्याचा आतेभाऊ सनी कुसळकर यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी निमसेसह इतर दहा जणांविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे यांचा 29 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर धोत्रे कुटुंबीयांनी माजी नगरसेवकांना तत्काळ अटक करावी, तपास सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावा आणि एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी केली होती. मागण्या मान्य होईपर्यंत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कुटुंबीयांची समजूत काढत मागण्या मान्य केल्यानंतर तपासाला वेग आला. युनिट-१ च्या पथकाने दोन तर आडगाव पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्याप फरार असून, धोत्रे कुटुंबीयांकडून तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात आहे.