Two young women arrested for extortion
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेल रोड परिसरात पहाटे कंटेनरचालकाला रस्त्यात अडवून कोयत्याने हल्ला करून खंडणी उकळल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गस्तीवरील पोलिसांनी या टोळीतील दोन तरुणींना घटनास्थळीच अटक केली. त्यांचे अन्य तीन साथीदार फरार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
कंटेनरचालक रामनिवास वर्मा (३८) रविवारी (दि. ७) पहाटे सातपूरच्या महिंद्रा कंपनीचा माल भरून नाशिक पुणे महामार्गावरून अहिल्यानगरकडे निघाले होते. पहाटे ४ च्या दरम्यान चेहेडी दारणा पुलावरून ते जात असताना चार ते पाच जणांनी त्यांचा कंटेनर थांबविला होता. त्यांच्यातील एकाने ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवेश करत रामसिंग यांच्या मनगटावर कोयत्याने हल्ला करत जखमी केले.
रिक्षातून आलेल्या अन्य चार ते पाच जणांनी वर्मा यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड काढत आणखी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार देताच मारहाण सुरू केली व कंटेनरमालकाच्या क्यूआर कोडवरून एक हजार रुपये मागून घेतले. नेमके याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांचे वाहन येताच तरुणांनी त्यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणींना तेथेच सोडून रिक्षातून पळ काढला.
पोलिसांनी निकिता विलास आव्हाड (२९, रा. जेल रोड) आणि कोमल सुरेश आढाव (२३, रा. जेल रोड) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. प्रेम घाटे, धीरज घाटे, शुभम आढे हे तिघे फरार असून, त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. दरम्यान या तरुणींना सोमवारी (दि. ८) न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.