Two arrested with fake notes worth Rs 5.5 lakh in Malegaon
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरात नकली चलनाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. मालेगाव किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन युवकांकडून पाच लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा एकूण एक हजार ८७ नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई शनिवारी रात्री १.३० च्या सुमारास तांबा काटा परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी धनराज नारायण धोटे (२०, रा. हिंगणघाट, जि. वर्धा), राहुल कृष्णराव आंबटकर (२५, रा. सावजीनगर, जि. वर्धा) या दोघांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडील दोन पिशव्यांत ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.
दोघांना न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ ऑक्टोबरला तालुका पोलिसांनी तब्बल १० लाखांच्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही नवीन कारवाई होत असल्याने शहरात नकली नोटांचे जाळे सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.