Trump tariffs | 'ट्रम्प टेरिफ'मुळे नाशिक जिल्ह्यातील तीन हजार कोटींची निर्यात धोक्यात Pudhari File Photo
नाशिक

Trump Tariffs | 'ट्रम्प टेरिफ'मुळे नाशिक जिल्ह्यातील तीन हजार कोटींची निर्यात धोक्यात

439 प्रकारच्या उत्पादनांची निर्यात मंदावली : वाहन व पोलद उद्योग क्षेत्राला सर्वाधिक फटका

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • २०२४ मध्ये ३ हजार १२५ कोटींची निर्यात तर गेल्या तीन वर्षात १० हजार ३१३ कोटींची निर्यात

  • अमेरिकेत ३० टक्क्याहून अधिक औषधे भारतातून निर्यात तर गतवर्षी ३१२ कोटींच्या औषधांची निर्यात

  • वाहने व त्यांचे सुटे भाग, बेअरिंगचीही मोठी निर्यात

नाशिक : अमेरिकेने भारतावर लादलेले ५० टक्के टेरिफ (आयात शुल्क) बुधवारपासून (दि. २७) लागू करण्यात आल्याने, जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कोटींची निर्यात धोक्यात आली आहे. गत वर्षी जिल्ह्यातून तब्बल ४३९ प्रकारच्या उत्पादनांची ३ हजार १२५ कोटींची निर्यात करण्यात आली होती. ट्रम्प टेरिफमुळे ही निर्यात आता अडचणीत सापडली आहे. विशेषत: जिल्ह्यातील औषध, वाहन व पोलाद उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत जगभरात ७१ हजार ३६४ कोटींची एकूण निर्यात झाली असून, त्यात एकट्या अमेरिकेतील निर्यातीचा वाटा १० हजार ३१३ कोटींचा आहे. अमेरिकेत एकूण वापरापैकी ३० टक्क्यांहून अधिक औषधे भारतातून जातात. नाशिक जिल्ह्यात औषधनिर्मितीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या असून, त्यांच्यामार्फत अमेरिकेत औषधे जातात. गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) जिल्ह्यातून ३१२ कोटींच्या औषधांची अमेरिकेत निर्यात झाली. हे प्रमाण जिल्ह्यातून अमेरिकेत होणाऱ्या एकूण निर्यातीच्या १० टक्के आहे. त्या खालोखाल वाहने व त्यांचे सुटे भाग, बेअरिंग, तेल व गॅससाठी वापरले जाणारे लोखंडी पाइप आदींचा समावेश आहे. ट्रम्प टेरिफमुळे हे सर्वच क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: औषध क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने, उद्योग क्षेत्र धास्तावल्याचे चित्र आहे.

  • जिल्ह्यातून गेल्यावर्षी निर्यात केलेली टॉप १० उत्पादने

  • औषधे व वैद्यकीय उपकरणे - ३१२ कोटी

  • वाहनांचे सुटे भाग - २६९ कोटी

  • बॉल व रोलर बेअरिंग - २२० कोटी

  • पोलादी साहित्य - २१७ कोटी

  • औद्योगिक वापराचे बोर्ड, पॅनल्स - १७६ कोटी

  • बीम, गर्डर - १५५ कोटी

  • गॅस, तेलाचे लोखंडी पाइप - ८९ कोटी

  • औषधी उत्पादने - ८६ कोटी

  • प्रोटिन, टेक्स्चर्ड प्रोटिन - ७२ कोटी

  • कोटिंग उत्पादने - ६३ कोटी

ट्रम्प टेरिफचा जिल्ह्यातील निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या अमेरिकेतील निर्यातीत किमान ५० टक्के घट होऊ शकते. केंद्र सरकारकडून यावर मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा आहे.
चंद्रशेखर सिंह, आयात-निर्यात अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT