त्र्यंबकेश्वर : तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी पर्वत फेरी मार्ग असा भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहिला.   (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Trimbakeshwar | दोन लाख भाविकांनी पूर्ण केली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : बम बम भोले..., ओम नम: शिवाय.., कैलास राणा शिवचंद्र मोळी अशा घोषणांनी त्र्यंबक परिसर अखंड दुमदुमला. निमित्त होते, तिसऱ्या श्रावणी सोमवारचे. सोमवारी (दि. १९) सुमारे दोन लाख भाविकांनी पारंपरिक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करत त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. १९९५ नंतर श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त होऊन ही प्रथा असंख्य भाविकांच्या मांदियाळीने अव्याहत सुरू आहे. यंदा तरुणाईचा जल्लोष अनुभवास आला.

रविवारी (दि.१८) सायंकाळनंतरच फेरी मार्ग भाविकांनी ओसंडून वाहण्यास प्रारंभ झाला होता. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृष्य पर्जन्यवृष्टी झाली. तेव्हा त्र्यंबकेश्वर शहरात आणि फेरी मार्गावरील भाविकांची तारांबळ उडाली. मात्र, त्यानंतर भाविकांचा उत्साह कायम होता. दर्शनापूर्वी कुशावर्त तीर्थात स्नानाचा आनंद घेतला जात होता. रविवार सायंकाळपासून ही रेलचेल पहायला मिळाली. सोमवारी सकाळपासून परतीच्या मार्गावर भाविकांचा ओघ सुरू झाला होता. बसेसला प्रवाशांची अलोट गर्दी झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या, तथापि इतर दिवसांप्रमाणे सामान्य गर्दी होती. ब्रह्मगिरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांची लक्षणीय संख्या होती. वन खात्याने पर्यटनशुल्क वसुली बंद ठेवली होती. दरम्यान, नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी बिघडलेले वातावरण तसेच नारळी पौर्णिमा असल्याने गर्दीत घट येईल, असा अंदाज व्यक्त झाला होता. मात्र तो निराधार ठरला.

प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी साबुदाना खिचडी, चहा, केळी, उपवासाचा चिवडा, राजगीरा लाडु आणि पाणी बाटली वाटप करण्यात येत होते. त्यामुळे भाविकांना फेरी सुखकर झाली. जागोजाग शिवमुर्ती ठेवलेल्या व डिजेवर शिवभजनाने वातावरण भारले होते. शिवमुर्तीजवळ सेल्फी घेण्याची चढाओढ पहायला मिळाली. सापगाव फाटा येथे डिजेच्या तालावर पदन्यास करीत भाविक उत्साह वाढवित होते.

पालखी मिरवणुकीत अलोट गर्दी

सायंकाळी कुशावर्तावर त्र्यंबकराजाची पालखी निघाली. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर मंदिरात नित्य प्रदोष पुष्प पूजक अॅड. शुभम आराधी यांनी पूजा केली. याचा लाभ दर्शन रांगेतील भाविकांना मिळाला. माजी आमदार निर्मला गावित, अभियंता रमेश गावित यांनी सोमवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. देवस्थानचे चेअरमन अॅड. नितीन जिवणे, विश्वस्त कैलास घुले, स्वप्नील शेलार यांची देवस्थान ट्रस्ट कार्यालयात भेट घेत भक्तांच्या सेवा-सुविधांबाबत चर्चा झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT