त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
श्रावणाचा दुसरा सोमवार आणि उत्तरभारतीयांचा शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने शिवभक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. रविवारी याची चुणूक शहरात दिसून आली. भाविक लक्षणीय संख्येने शहरात दाखल झाले होते. प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्येक चौकात पोलिसांसाठी मचान बांधण्यात आले असून, शनिवारपासूनच सर्वत्र खडा पहारा लावण्यात आला आहे. शनिवार सकाळपासून खंबाळे पार्किंग सुरू करण्यात आले आहे. बाहेरगावची वाहने शहराच्या बाहेर ठेवल्याने शहरात भक्तांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने मागच्या श्रावणी सोमवारी उद्भवलेली अनागोंदी या वेळी अनुभवास मिळणार नाही, अशी अपेक्षा आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शनाचे योग्य नियोजन केले आहे. विश्वस्त कैलास घुले यांनी स्वतः दर्शनरांगेची पाहणी केली. भक्तांना रांगेत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल अशा सूचना दिल्या आहेत. सोमवारी अतितात्डीचे २५०० रुपये देणगी दर्शन आणि २०० रुपये देणगी दर्शन या दोन्ही रांगा बंद राहतील. आलेल्या सर्व भाविकांना पूर्व दरवाजा मोफत दर्शनरांगेतून दर्शन मिळेल, असे नियोजन झाले आहे.
त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने शहराच्या काही भागात भाविकांसाठी फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पाऊस होत असताना देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी दुपारी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी शहरात पाहणी केली. आवश्यक तिथे सूचना करण्यात आल्या आहेत.
सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गर्दी राहील यासाठी रविवारी सकाळी तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी भाविकांसोबत अनवाणी पावलांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. या वेळी त्यांनी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना काय अडचणी येतात याचा स्वतः अनुभव घेतला असून, त्यानुसार यंत्रणेला सूचना दिल्या.