नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार असल्याच्या सर्व चर्चांना जिल्हा प्रशासनाने अखेर पूर्णविराम दिला आहे. आगामी ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे खुले राहणार असल्याची अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.
राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने गत आठवड्यापासून राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणास्तव ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवस मंदिर पूर्णपणे बंद ठेवले जाईल, अशी चर्चा होती. मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र, प्रशासनाने हा संभ्रम दूर करत स्पष्ट केले आहे की, मंदिर बंद राहणार नसले तरी राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल आणि व्हीआयपी दौरा लक्षात घेता कडक सुरक्षाव्यवस्था लागू असेल. मंदिरात होणारी अवाजवी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष पास पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ३ हजार भाविकांना पासद्वारे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असून, केवल वैध पासधारकांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाईल.
येत्या ३१ ऑक्टोबरला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच वेळी ऐतिहासिक ध्वजारोहण पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकमधील विकासकामांना वेग देण्यात आला आहे. कुशावर्त तीर्थ व परिसर सुशोभीकरण, भाविकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छता व इतर पायाभूत सुविधा अशी एकूण ३२ महत्त्वाची विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने २५ ऑक्टोबरची डेडलाइन निश्चित केली आहे. त्र्यंबकेश्वरनगरी सध्या कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.