ञ्यंबकेश्वर : पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (दि. १२) शिवभक्तांची गर्दी हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी (दि. ११) त्र्यंबक नगरीत आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे भाविक यात जात असल्याचे दिसून आले.
वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी 30 रुपये शुल्क आकारले जाते. वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाने श्रावण महिन्याचे सर्व सोमवारी पर्यटन शुल्क वसुली बंद ठेवण्यात आली आहे.
ञ्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूने असलेला रिंगरोड भुयारी गटारीसाठी खोदण्यात आला, मात्र नंतर त्याची डागडुजी करताना झालेले काम अत्यंत निकृष्ट असल्याचे पावसाने उघड झाले आहे. हा रस्ता मधोमध खचला तर अनेक ठिकाणी दबला आहे. वाहनचालकांना या रस्त्याने मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.
ञ्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असल्याचा संदेश मंदिर व्यवस्थापनाने सर्वदूर पोहोचवला आहे. मात्र, दिवभरातील बहुतेक वेळ देवस्थान ट्रस्ट इमारतीच्या उत्तर दरवाजाच्या समोर वाहनांचा ताफा उभा राहिलेला दिसतो. व्हीआयपी दर्शन बंद केले असेल तर हा वाहनांचा ताफा कोणाचा असा सवाल? भाविकांमध्ये उपस्थित होत आहे. तासन्तास उभ्या असलेल्या या वाहनांनी रस्त्यावरील रहदारी थांबते. पायी चालणाऱ्या भाविकांना मार्ग कसा काढावा याचा प्रश्न पडतो. त्र्यंबकेश्वर मंदिरात थेट दर्शनासाठी दोनशे रुपयांचे तिकिट मिळवण्यासाठी भर पावसात उभे राहत असल्याचे चित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात देखील कायम राहिले आहे.
नाशिक : शहर-परिसरातील शिवमंदिरांमध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्ताने (दि. १२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीमधील श्री कपालेश्वर मंदिरातर्फे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी पाच श्रावणी सोमवार आल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह आहे. श्री कपालेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्ताने पहाटे महाभिषेक व महापूजन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता मंदिर संस्थानतर्फे परिसरामधील पालखी मिरवणूक काढण्यात येईल. रात्री श्रींची महाआरती संपन्न होणार आहे. गंगापूर राेडवरील श्री सोमेश्वर महादेव मंदिरातही श्रावणी सोमवारसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीतर्फे विशेष नियोजन केले गेले आहे. याव्यतिरिक्त गोदाघाटावरील श्री नारोशंकर, सराफ बाजारातील तिळभांडेश्वर, पंचवटीमधील मनकामेश्वर, घारपुरे घाटावरील सिद्धेश्वरसह शहरातील छोट्या-मोठ्या शिवमंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली गेली आहे. दरम्यान, शहरातील निरनिराळ्या धार्मिक संस्था तसेच सार्वजनिक मित्रमंडळाकडून भक्तिमय गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.