नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर गुरुवारी (दि.२१) भारतीय महिला फेडरेशन आणि आयटक कामगार संघटनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयासमोर रिकामे हंडे घेऊन जोरदार आंदोलन करण्यात आले. महिलांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मुळेगावातील महिलांना अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी दररोज २ ते ४ तास खर्च करावे लागत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. विहिरीतील दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार वाढले आहेत.
आतापर्यंत चार महिला व मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी आणि जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत मुळेगावातील पाइपलाइनचे काम पूर्ण होईपर्यंत राजवाडा व कोळीवाडा भागात तातडीने सिंटेक्स पाण्याच्या टाक्या बसविण्याचे आदेश देण्यात आले.
त्या टाक्यांत दररोज पाणी भरल्यानंतर स्थानिक महिलांच्या सह्या घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. AITUC गावातील विहिरीतील गाळ काढण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले. दरम्यान, चार दिवसांत पाण्याच्या टाक्या बसवाव्यात अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात राजू देसले, प्राजक्ता कापडणे, मनोहर पगारे, लता जाधव, सोनाली जाधव, अनिता जाधव, सुनीता रामसे, मथुरा तिवारी, रमाबाई जाधव, लक्ष्मी पोटिंदे, पूजा पोटिंदे यांच्यासह यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का?
आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का, आम्हाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, असा संतप्त प्रश्न मुळेगावच्या आंदोलक महिलांनी उपस्थित करीत तीव्र संताप व्यक्त केला. गावातील पाणी समस्येमुळे मुली विवाहासाठी येण्यास तयार नसल्याची व्यथादेखील महिलांनी मांडली. आमदार, खासदार आणि सरपंच मतदानाच्या वेळी येतात. मात्र, पाणी आणण्यासाठी मदत का करत नाहीत? असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला.
मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवल्या
बाटल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दाखवत हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवून जाब विचारला. त्यानंतर त्यांनी अर्ध्या तासात परत येऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.