Nashik Trimbakeshwer kumbhmela khushawarta kund / नाशिक कुंभमेळा कुशावर्त Pudhari News Network
नाशिक

Kushavarta Tirth Closed | त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! कुशावर्त तीर्थ 31 ऑक्टोबरपर्यंत बंद

Kushavarta Tirth Closed | जलशुद्धीकरण, दगडी पायऱ्यांची दुरुस्ती अन् हेरिटेज रोषणाईचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थाच्या विकास व संवर्धन कामांना वेग आला असून, या कामांसाठी बुधवार (दि. ३०) पासून ३१ ऑक्टोबरपर्यंत कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुशावर्त कुंडातील पाणी शुद्धीकरण यंत्रणा, ऐतिहासिक दगडी पायऱ्यांची दुरुस्ती, हेरिटेज रोषणाई, नवीन ध्वजस्तंभ तसेच परिसरातील रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण निर्मूलनाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुशावर्त परिसरातील प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे केली जात आहेत. यात कुशावर्त कुंडातील पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी ताशी ३०० घनमीटर अर्थात तीन लाख लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे संपूर्ण कुंडातील पाणी अवघ्या तीन तासांत शुद्ध करणे शक्य होणार आहे.

सिंहस्थाच्या काळात भाविक कुंडात स्नान करणार असल्याने ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, कुशावर्त तीर्थाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत दगडी पायऱ्या आणि अन्य ऐतिहासिक घटकांची दुरुस्ती व संवर्धन करण्यात येत आहे. यात मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता परिसराचे जतन करण्यावर भर दिला आहे.

तसेच कुंडाभोवतीच्या ऐतिहासिक मंदिरांवर आकर्षक हेरिटेज विद्युत रोषणाईही करण्यात येत आहे. यासह सिंहस्थाच्या प्रारंभानिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थावर भव्य ध्वजस्तंभ उभारणी आणि ध्वजारोहणाशी संबंधित तसेच कुंडाच्या मुख्य परिसरातील अत्यावश्यक कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कामे:

कुशावर्त तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील उर्वरित मोठी पायाभूत सुविधा आणि हेरिटेज संवर्धनाची कामे डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २०२७ मधील मुख्य अमृतस्नानाच्या पर्वणीपूर्वी कुशावर्त परिसरातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

गर्दीसाठी रुंद रस्ते:

कुशावर्ताकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासह शाहीमार्गावरील अतिक्रणे हटवण्याची आणि रस्ते प्रशस्त करण्याची कामेही सुरू आहेत. सिंहस्थाच्या पर्वणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी मार्गांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

"कुशावर्त तीर्थ जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. यातील जलशुद्धीकरण यंत्रणा नूतनीकरणासह कुंडाच्या कामासाठी कुंड पूर्ण रिकामे करावे लागणार आहे. तसेच जलशुद्धीकरण यंत्रणेचा संपूर्ण संच व पाइपलाइन काम करावे लागणार आहेत. ही कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून सर्व विकासकामांचे नियोजन केले आहे."
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT