Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela | साधुग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करावे : महाजन

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela | त्र्यंबकेश्वरला भेट देऊन विकासकामांची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आणि पावसाळा एकाच वेळी येत असल्याने साधुग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करावे. पावसाळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्री महाजन यांनी मंगळवारी (दि. ७) दुपारी त्र्यंबकेश्वर येथे नियोजित साधुग्राम, घाट परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलत होते.

महापौर हिमगौरी आडके, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अहिल्याकुंड परिसरालगतच्या नियोजित साधुग्रामच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला.

नियोजित साधुग्राम परिसरात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आल्याने आगामी कुंभमेळ्याच्या कालावधीत अशाच प्रकारची अतिवृष्टी झाल्यास भाविक, साधू-महंत तसेच प्रशासनाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

त्यांनी नदीपात्रात उभारण्यात येत असलेल्या नवीन घाटांच्या कामांचीही पाहणी करत कामांचा दर्जा, सुरक्षितता आणि पूरस्थितीचा विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले. साधुग्राम परिसरात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागेचीही पाहणी करण्यात आली. संभाव्य धोके लक्षात घेऊन आणि सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आवश्यक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी आणि प्रभावी राबवण्याच्या उपाययोजना सूचना केल्या.

रस्ते, सुरक्षा उपाययोजनांची पाहणी

त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी (दि. ७) त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी पहिणे-भिलवाड रस्ता तसेच प्रयागतीर्थाच्या मागील त्र्यंबकेश्वर-तळवाडी रस्त्याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्यांची सद्यः स्थिती, वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलेले पर्यायी मार्ग, आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या नियोजनाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. पावसाळ्याच्या कालावधीत संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT