

Municipal Corporation orders contractors for patchwork on dug up roads
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध विकासकामांसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचा संयम सुटत असतानाच महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर हालचाली सुरू केल्या आहेत. पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि गॅस पाईपलाईनच्या कामानंतर पूर्ववत न झालेल्या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी शहरातील सर्व खोदलेल्या रस्त्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती शुक्रवारी (दि. ३) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या पाच वर्षांत राज्य शासन, स्मार्ट सिटी, महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतून शहरात सुमारे १,१०० कोटी रुपयांचे रस्ते उभारण्यात आले. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनच्या कामांसाठी हेच रस्ते पुन्हा खोदण्यात आले. अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते पूर्ववत न झाल्याने खड्डे, उंचसखल पृष्ठभाग आणि धोकादायक स्थितीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेव्या निर्देशानुसार अभियंते शहरातील प्रत्येक खोदलेल्या रस्त्याची पाहणी करून अहवाल तयार करणार आहेत. संबंधित कामाची जबाबदारी अद्याप कंत्राटदारांकडे असल्यास त्यांच्याकडूनच पॅचवर्क करून घेतले जाणार आहे. तर सिमेंटचे जुने किंवा निकृष्ट पॅचवर्क आणि हमी कालावधी संपलेल्या ठिकाणी महापालिका स्वतः डांबरीकरण करून रस्ते दुरुस्त करणार आहे.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय कमी करणे हे प्राधान्य असून, ज्या कंत्राटदारांवर कामाची जबाबदारी आहे त्यांनी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित ठिकाणचे पॅचवर्क महापालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
दुरुस्तीचा खर्च पुन्हा मनपावर
शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे कंत्राटदारांकडून अपेक्षित दर्जाची दुरुस्ती न झाल्याने आणि अनेक कामांचा हमी कालावधी संपल्याने आता महापालिकेलाच स्वतःच्या निधीतून डांबरी पॅचवर्क करावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता असून, नियोजनातील त्रुटींना जबाबदार कोण, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला
शहरातील रस्त्यांची होणार पाहणी
शहरातील प्रत्येक खोदलेल्या रस्त्याची अभियंत्यांकडून तपासणी केली जाणार आहे. रस्ता कोणत्या विभागाने खोदला, काम पूर्ण झाले की नाही, पॅचवर्कची स्थिती काय आहे आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाकडे आहे, याचा सविस्तर आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.
समन्वयाअभावी सार्वजनिक निधीवर ताण
विकासकामांपूर्वी संबंधित विभागांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने नव्याने तयार झालेले रस्ते वारंवार खोदले जात आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतरही वेळेत आणि दर्जेदार दुरुस्ती होत नसल्याने सार्वजनिक निधीवर अतिरिक्त भार पडत आहे.