Nashik Simhastha Kumbh Mela 
नाशिक

Simhastha Kumbh Mela | आखाड्यांची कामे महिनाअखेर सुरू करा

Simhastha Kumbh Mela | साधू-महंतांची मागणी ; विकासकामांसाठी 100 कोटींपेक्षा अधिक निधी ; शासनाचे मानले आभार

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने सर्वाधिक निधी देऊन साधूंचा सन्मान केला आहे. समस्त साधू आखाड्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या सर्वांचे आभार.

त्याचसोबत दिलेल्या निधीचा सुयोग्य वापर करण्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत कामाला प्रारंभ करावा, अशी अपेक्षा आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केली.
साधू-महंतांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी केलेला पाठपुरावा खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, यापुढे कुंभमेळा भव्यदिव्य होईल, असे चित्र निर्माण झाले असल्याचे मत त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंत व्यक्त करत आहेत.

१० आखाड्यांना ७३ कोटी आणि सुमारे १०० आश्रमांना ३० कोटी असा १०३ कोटी रुपयांचा निधी साधू-महंत आणि भक्त यांच्या सेवा सुविधांच्या विकासकामांसाठी उपलब्ध होत आहे. त्र्यंबकेश्वरच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या सहयोगाने विकासाची संधी प्राप्त झाली आहे.

साधूंनी वेळोवेळी केलेल्या मागणीप्रमाणे प्रारंभी मंजूर केलेला ९ कोटींचा निधी थेट ७ कोटी ३० लाख रुपये इतका मागणीपेक्षा जास्त दिला आहे. संपूर्ण कुंभमेळ्यासाठी सर्वाधिक निधी देणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याच्या तुलनेत ५ पट अधिक असा ३५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी निधी देऊन साधू-आखाड्यांच्या कुंभमेळ्याला प्रचंड मोठे पाठबळ दिले आहे.

या निधीचा आता सुयोग्य वापर झाला पाहिजे. जनतेला कायमस्वरूपी मूलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. कुंभमेळा निमित्ताने दळणवळण आणि इतर गरजांसाठी नाशिक जिल्हा समृद्ध होईल, अशी अपेक्षा महंत सरस्वती महाराज यांनी व्यक्त केली.

सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत विकासकामांना प्रारंभ झाल्यास मार्च २०२७ अखेरपर्यंत महत्त्वाची सर्व विकासकामे पूर्ण होतील. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल. आखाड्यांच्या देवता आणि आचार्य यांचे आगमन जूनअखेरपर्यंत होईल, अशी येथे चर्चा आहे. एकूणच ऑक्टोबर २०२६ ते मे २०२७ अखेरपर्यंत तब्बल आठ महिने विकासकामांना वाव मिळतो आहे.

"शासनाने गत १२ वर्षांत देशभरात झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत सर्वाधिक निधी कुंभमेळ्यासाठी दिला आहे. संस्कृतीचा उत्सव असलेला कुंभमेळा यावेळी अधिक भव्यदिव्य असा होईल. त्यासाठी शासनाचे आभार."
— महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष आनंद आखाडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT