त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीपात्राला १,१०० कोटी रुपये खर्च करून शासनाकडून घाट बांधणीचे काम सुरू आहे. तथापि अखिल भारतीय उदासीन निर्मल परिषदेने याबाबत तीव्र आक्षेप घेत शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा खंडित होणार नाही. शाहीमार्ग आणि शाहीस्नानाच्या ठिकाणात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही असा कडक इशारा दिला आहे.
याबाबतचे पत्र सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले आहे. बडा उदासीन आखाड्याचे अध्यक्ष महंत दुर्गादास महाराज यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीला बांधण्यात येणाऱ्या घाटांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाने नव्याने घाट बांधून तेथे स्नान करण्याचा आग्रह करणे चुकीचे आहे. भाविकांमध्ये गैरसमज पसरण्याची शक्यता असते. अमृतस्नानाच्या दरम्यान भाविक भ्रमीत होतील आणि त्यामुळे भाविकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचा परिणाम धावपळ च चेंगराचेंगरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रयागराज येथे घडलेली दुर्दैवी घटना शासनाच्या अशा प्रकारच्या संभ्रमीत करणाऱ्या निर्णयामुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आखाड्यांचे साधू शासनाकडून पैसे घेतात, असा भक्तांमध्ये संभ्रम निर्माण करणारी चर्चा समाजातील काही दांभिक लोक पसरवतात. आखाडे शासनाकडून कधीही पैसे घेत नाहीत.
शासन साधू आणि भक्तांसाठी सुविधा निर्माण करणारी विकासकामे करत असते. प्राधिकरणाने सर्व आखाड्यांच्या सोयीसाठी खर्च केलेली रक्कम व विकासकामांची यादी शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष महंत दुर्गादास महाराज, महंत रामनवमीदास महाराज, हंस मुनी, महंत शिवानंद महाराज, मुकामी महंत दानमुनी, गोपालदास, इंदलदास उपस्थित होते. अ. भा. उदासीन निर्मल परिषदेची स्थापना त्र्यंबकेश्वर येथे १० शैव साधूंचे आखाडे आहेत. पैकी दोन उदासीन आणि एक निर्मल संप्रदायाचा आखाडा आहे. त्यांनी अ. भा. उदासीन निर्मल परिषद स्थापन केली आहे.