नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त जलयात्रेचे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. त्याच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांचासह काही मंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर व मध्य प्रदेशमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथून एकाच वेळेस ही जलयात्रा सुरू होणार आहे. २५ एप्रिलला त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ गुरुपीठ येथे सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री फडणवीस या जलयात्रेचा शुभारंभ करतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे असतील, तर विशेष अतिथी म्हणून इंदूर येथील श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर बहादूर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी
उपस्थित राहणार आहेत. तसेच लोणी येथील वरद विनायक सेवा धाम ट्रस्टचे हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, हभप संजयनाना धोंडगे आदी उपस्थित राहणार आहेत. ही जलयात्रा पुढे नाशिक, सिन्नर, संगमनेर मार्गे शिर्डी येथे पोहोचेल. तर मध्य प्रदेशमधील चौंडी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या जलयात्रेता शुभारंभ होईल. तेथून ही जलयात्रा अहिल्यानगर व तेथून शिर्डी येथे आगमन होईल.
असा असेल जलयात्रा मार्ग चौंडी येथून निघालेली जलयात्रा व त्र्यंबकेश्वर येथून निघालेली जलयात्रा यांचा संगम शिर्डी येथे २६ एप्रिलला होईल. रविवारी संगम कार्यक्रम होईल. २७ एप्रिलला शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर व घृष्णेश्वर येथे जलयात्रा पोहोचेल, २८ एप्रिलला घृष्णेश्वर येथून गोताळा घाट मार्गे कन्नड, चाळीसगाव मार्गे धुळे येथे येईल. तेथून ही जलयात्रा महेश्वरकडे प्रस्थान करेल. २९ एप्रिलला महेश्वर येथे जल व माती समर्पण कार्यक्रमाने जलयात्रेचा समारोप होणार आहे.