Changes in traffic routes and special arrangements for outdoor parking announced
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार (दि. 11) यानिमित्त लाखो भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा व त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दाखल होणार आहेत. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल व बाह्य पार्किंगची विशेष व्यवस्था जाहीर केली आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पवार यांनी याबाबत माहिती दिली.
दि. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर शहरात नाशिककडून येणार्या खासगी वाहनांना तळेगाव फाटा येथे, पालघर व मोखाडा मार्गे येणार्यांना अंबोळी गावाजवळ, तर मुंबईकडून येणार्यांना पहीणे गावाजवळ थांबवण्यात येणार आहे. या ठिकाणांहून भाविकांना एसटी व सिटीलिंक बसद्वारे त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचवले जाईल. पोलिसांनी भाविकांना गर्दी टाळण्यासाठी शक्य तितका बससेवेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
तिसर्या आणि चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणेसाठी शहर व जिल्ह्यातून हजारो भाविक जात असतात. त्यासाठी ठक्कर आणि मेळा बसस्थानकातून विशेष बसेस सोडल्या जात असतात. या सर्व पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे.
रविवारी (दि. 10) दुपारी 12 ते सोमवारी (दि. 11) रात्री 8 पर्यंत रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता इतर सर्व खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंद राहणार आहे. याशिवाय ठक्कर बसस्थानक परिसरातील तालुका पोलिस ठाणे, मेळा बसस्थानक, मनसे कार्यालय, बाल सुधारालयासमोरील रस्त्यावर एसटी, सिटी बस वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे. या वाहनांना तालुका पोलिस ठाणे ते ठक्कर बाजारकडे जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नल मार्गे वळविण्यात आली आहे. ठक्कर बाजार मनसे कार्यालयाकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक ही मोडक सिग्नल, सीबीएसमार्गे येईल. रुग्णवाहिका, अग्निशमन या वाहनांना मात्र, सर्वत्र प्रवेश खुला राहणार आहे.
नाशिककडून येणार्या भाविकांसह जळधर गिरणारे मार्गे येणार्यांसाठीही अंबोळी येथे पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. मुंबई, इगतपुरी, घोटी मार्गे येणार्यांसाठी पिंप्री येथे पार्किंगची सोय असेल. तर तात्पुरते पर्यायी मार्ग नाशिक- सातपूर- गोवर्धन- गिरणारे- देवगाव- अंबोळी- जळधर तसेच जळधर- अंबोळी- देवगाव- गिरणारे- नाशिक असे असणार आहेत.