नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर विकास प्राधिकरणामार्फत त्र्यंबकरोडवर राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा निषेध करत बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठींबा दिला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली नाशिक महानगर विकास प्राधिकरणामार्फत शेतकऱ्यांची घरे, व्यावसायिकांनी उभारलेली हॉटेल्स, दुकाने, जनावरांचे गोठे अनधिकृत ठरवत बुलडोझर चालविला जात आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत त्र्यंबकरोडवरील दहाहून अधिक गावांमधील शेकडो कुटुंब रस्त्यावर आले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांचे आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनस्थळी भेट देत पाठींबा दर्शविला. उबाठाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी एनएमआरडीएच्या कारवाईचा निषेध करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
समृद्धी अनुभवलेल्या, सतत गजबजलेल्या त्र्यंबक रस्त्यावर सरकारच्या निर्दयीपणामुळे आता फक्त सन्नाटा पसरला आहे. दूतर्फा उध्वस्त घरे, सिमेंट-विटांच्या ढिगाऱ्यांचे दृश्य अस्वस्थ करीत आहे. नाशिक- त्रंबकेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी पिंपळगाव बहुला जकात नाक्यापासून ते पेगलवाडीपर्यंत दुतर्फा 25 ते 35 मीटर जागा घेण्याचा नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने धडाका लावला आहे. यामुळे पिंपळगाव बहुला, बेळगाव ढगा, तळेगाव, अंजनेरी, खंबाळे, पेगलवाडी यासह दहाहून अधिक गावातील सुमारे अडीच हजार शेतकरी व व्यावसायिक संकटात सापडले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी उबाठाचे राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंतराव गिते, सचिव मसूद जिलानी, उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, भैय्या मणियार, उत्तम खांडबाले आदी उपस्थित होते.