नाशिक : संतप्त आंदोलकांनी आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.  
नाशिक

Tribal students protest nutrition GR |जीआरची होळी करीत आयुक्तालयावर धडक

Tribal students protest nutrition GR-आदिवासी विद्यार्थ्यांचा रोष उफाळला; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच!

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमधील पोषण आहाराबाबत जारी करण्यात आलेल्या दि. ५ ऑगस्टच्या शासन निर्णय (जीआर) विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. गुरुवारी (दि. २०) संतप्त विद्यार्थ्यांनी या अन्यायकारक शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करीत थेट आदिवासी विकास आयुक्तालयावर जोरदार धडक दिली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन करीत, घोषणाबाजी केली. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे विद्यार्थ्यांनी आरपारच्या लढ्याचा इशारा देत ठिय्या आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पोषण आहाराबाबतचा जाचक निर्णय तत्काळ रद्द करा, सर्पदंशाने प्राण गमवावा लागलेल्या निष्पाप विद्यार्थिनीच्या वारसांना तत्काळ भरपाई द्यावी आणि निष्काळजीपणाला जबाबदार असणारे आदिवासी विकासमंत्री, सचिव व आयुक्तांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशा आक्रमक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आयुक्तालयाचे प्रवेशद्वार रोखून धरले होते. 'आदिवासीविरोधी सरकारचा धिक्कार असो' अशा तीव्र घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आयुक्तालयाच्या वेशीवरच जीआरच्या चिंधड्या करीत शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला.

सुमारास आंदोलक युवकांनी गुरुवारी दुपारी १२.३० च्या आयुक्तालयाला वेढा घातला होता. आंदोलक वारंवार आत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाकडून कोणताही ठोस लेखी निर्णय न झाल्याने वाटाघाटी फिसकटल्या.

दोन दिवसांचा अल्टिमेटम

अधिकारी आणि आंदोलकांमधील संवाद निष्फळ ठरल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी शासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास ईदगाह मैदानावर ठिय्या मांडून लढा अधिक तीव्र करण्याचा एल्गार आंदोलकांनी केला. या आक्रमक आंदोलनात प्रशांत गावंडे, सचिन पावरा, सागर पावरा, तुळशीराम खोटरे, सोनू गायकवाड, अमोल राजेगवारी व वैभव गांगुर्डे यांच्यासह शेकडो विद्यार्थी मैदानात उतरले होते.

दिवसभर रस्ता बंद

आंदोलकांनी आदिवासी आयुक्त कार्यालयावर धडक देत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यामुळे गडकरी चौक ते त्र्यंबक नाका रस्ता पोलिस प्रशासनाकडून बंद करण्यात आला होता. आंदोलनामुळे हा रस्ता वारंवार बंद करावा लागत आहे. रस्ता बंद ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

चौधरी यांच्या भाषणाला दाद

आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडलेल्या युवकांना संबोधित करताना 'बिन्हाड' आंदोलनाचे नेते ललितकुमार चौधरी यांनी प्रशासनाविरोधात घणाघाती भाषण केले. १५० दिवस रस्त्यावर अहोरात्र बसूनही प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे पुन्हा मैदानात उतरावे लागल्याची खंत त्यांनी वन्हाडी भाषेत व्यक्त केली. त्यांच्या आक्रमक भाषणाला आंदोलकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT