नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या आणि तेथून नाशिककडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ पासून दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ पर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड व नवीन घाट येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
या वेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह नागरिक आणि भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ अन्वये अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलक आणि वाहतूक चिन्हे लावण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आल्या आहेत.
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे: अमृत चौक - बारदान फाटा - गोवर्धन - गिरणारे - धोंडेगाव - देवगाव - वाघेरा फाटा - अंबोली फाटा - सापगावमार्गे त्र्यंबकेश्वर येथे जावे.
त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे: अंबोली टी पॉइंट - वाघेरा फाटा - कोने - साप्ते - देवगाव - गिरणारे - गोवर्धनमार्गे नाशिककडे यावे.
मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी: वैतरणा फाटा - नाशिक - अमृत गार्डन - बारदान फाटा - गोवर्धन - गिरणारे - धोंडेगावमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जावे.
पहिले परिसरातून जाणाऱ्या वाहतुकीसाठी: पहिले - आहुर्ली - सांजेगाव - वाडीवन्हे - नाशिक हा पर्यायी मार्ग वापरावा, तर पहिले - भिलमाळ - निरगुडापाडा - जांभूळपाडा - सापगावमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाता येईल.