Tractor Accident 
नाशिक

Tractor Accident | खोडलेल्या रस्त्यात ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

Tractor Accident | अहिवंतवाडी - पिंपरीअंचला मार्गावर पहाटे भीषण दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

कसबे वणी : पुढारी वृत्तसेवा
रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे याचा मृत्यू झाला, तर ऑकार भुसार हा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि. ६) सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अहिवंतवाडी परिसरात ही दुर्घटना घडली. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात रस्त्यांच्या कामातील सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अहिवंतवाडी येथून टॉमॅटो भरून ट्रॅक्टर खोरी फाटा येथील बाजारपेठेकडे जाताना सकाळच्या झुंजुमुंजू वातावरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटला. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करीत पंकज ठाकरे आणि ऑकार भुसार या दोघांनाही रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जखमी ऑकारची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे झाल्यानंतरही साइडपट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नाहीत. त्या भरण्यासाठी रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी खोल खोदकाम केलेले आहे. परिणामी, अरुंद रस्त्यावरून दोन वाहने समोरासमोर आल्यास एका वाहनाला मागे जावे लागते.

तसेच बाजूला सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठा आणि शेतीमालाच्या वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढलेली असताना अशाप्रकारे खोदकाम धोकादायक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करून ते उघडेच ठेवलेले असून, सुरक्षा व्यवस्था अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामावर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.

बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर नसल्याचा आरोप

  • या मार्गावर रस्त्याच्या कडेला सुमारे तीन ते चार फूट खोल खोदकाम केलेले आहे. मात्र, या ठिकाणी बॅरिकेडिंग, धोक्याची सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावलेले नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पहाटेच्या अंधुक प्रकाशात वाहनचालकांना रस्त्याची हद आणि बाजूला असलेले खोल खड्डे दिसणे कठीण होते. त्यामुळे अशा ठिकाणी अपघाताचा धोका वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT