Sangli News : कसबे डिग्रज, मालगाव, कवलापूर सुन्न

वारकरी महिलांच्या मृत्यूने ग्रामस्थांना धक्का
Sangli News
कसबे डिग्रज, मालगाव, कवलापूर सुन्न
Published on
Updated on

सांगली : सोमवारी सकाळी सासवड येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास जेजुरीजवळील भोंगळे मळादरम्यान एक ट्रक संत ज्ञानेश्वर मंदिर कसबे डिग्रज यांच्या दिंडीत घुसला व या ट्रकने अनेक महिला वारकऱ्यांना चिरडले. यामध्ये तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. पंढरीच्या वाटेवर झालेल्या या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन वारकरी महिला ठार झाल्याने त्यांची तीन गावे सुन्न झाली.

पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे ट्रक वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. या दुर्घटनेत तीन वारकरी महिला ठार झाल्या, तर इतर आठजण जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी (दि. १३) सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या दरम्यान घडली.

राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), माधवी राजेंद्र सलगरे (५५, रा. मालगाव, ता. मिरज) आणि नंदा पवार (६०, रा. कवलापूर, ता. मिरज) साऱ्या वारकरी महिला. पांडुरंगाच्या दर्शनाला जातानाच या तिघींचाही भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आक्काताई कोळी, गीता हंकारे, कासाबाई गजगे, लक्ष्मी गडदे ( सर्व रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) या गंभीर जखमी झाल्या. त्या खासगी रुग्णालयात आहेत.

मिरज तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे १५० वर वारकरी ६ जुलै रोजी कसबे डिग्रजमधील संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पाखली दिडींतून आळंदीला गेले होते. आळंदीमध्ये पूर आल्याने ही दिंडी आळंदीपासून काही अंतरावरच थांबली होती. तेथून वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे सर्वजण निघाले होते. वारकर्‍यांच्या दिंडीचा पाचवा दिवस होता. ही दिंडी जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे आल्यानंतर या दिंडीमध्ये ट्रक घुसला आणि होत्याचे नव्हते झाले. यातील तीन महिला ट्रकखाली चिरडल्या गेल्या. पंढरीच्या वाटेवरच त्यांना मरण आले.

श्री संत ज्ञानेश्वर मंदिर कसबे डिग्रज येथील संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी दिंडीतून दिनांक ६ जुलै रोजी कसबे डिग्रज येथून निघाली. आळंदी येथे पोहोचण्यापूर्वी पूर आल्यामुळे दिंडी आळंदी येथून २ किलोमीटर अलीकडे उतरली. तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. रात्री जेजुरी येथे मुक्काम करून पुढील प्रवासास निघाले असता हा अपघात घडला. यात कसबे डिग्रजच्या राजश्री शंकर भोसले (वय ५५) यांचे जागीच निधन झाले. याव्यतिरिक्त आक्काताई कोळी, गीता हंकारे, कासाबाई गजगे व लक्ष्मी गडदे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राजश्री भोसले यांचे कुटुंबीय मूळ चिकोडी (ता. बेळगाव) येथील. ६० वर्षांपूर्वी हे कुटुंब कसबे डिग्रज येथे वास्तव्यास आले. त्या शेतीत काम करीत उदरनिर्वाह करीत होत्या. कुटुंब पहिल्यापासून विठ्ठलभक्त तसेच त्यांचे पतीही दररोज गावातील सर्व मंदिरात पायी जाऊन दर्शन घेत. राजश्री भोसले याही विठ्ठलाच्या भक्त असलेने यापूर्वी ४-५ वेळा त्यांनी पायी दिंडी केली होती. मध्यंतरी काही वर्षे दिंडीत जात नसत. परंतु खूप वर्षांनी यावेळी त्यांनी दिंडीस जाण्याचे ठरवले व त्या निघाल्या सुद्धा. परंतु काळाचा घाला आणि दैवी इच्छा यापुढे त्यांना परत येता आले नाही.

रात्री अंत्यसंस्कार

अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांनी तातडीने जेजुरीकडे धाव घेतली. ही बातमी गावात पसरल्यानंतर गावकर्‍यांनी व दिंडीशी संबंधित असणार्‍यांनी मृतांच्या घराजवळ गर्दी केली. रात्री त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले व अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news